भारताच्या युवा संघाने अलीकडेच पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ ने पराभव केला. या विजयाने चाहते कमालीचे आनंदित असतानाच माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने ( Ajay Jadeja) भारतीय क्रिकेटमधील संघातील खेळाडूंची निवड आणि संघातून वगळण्याच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांनंतर इशान किशनचे ( Ishan Kishan) नाव प्लेइंग-११ मधून गायब असल्याचे पाहून जडेजाला आश्चर्य वाटले.
इशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील ३ सामन्यांमध्ये ३६.६७ च्या सरासरीने ११० धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. इशानने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात खराब फलंदाजी आणि खराब यष्टिरक्षणानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग-११ मधून वगळले आणि त्याच्या जागी जितेश शर्माला खेळवले. इशानला बेंचवर बसवल्यामुळे अजय जडेजा संतापला. इशानला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
जडेजा म्हणाला,''भारतीय क्रिकेटमध्ये निवडीचा फारसा विचार कोणी करत नाही, रिजेक्शनच होते. हे अनेक दशकांपासून होत आहे. आम्ही नुकतीच पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळली. इशान किशनला केवळ ३ सामने मिळाले. मला तो खेळाडू आवडतो कारण तो वन डे सामन्यांमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.
''थकव्यामुळे त्याला परत पाठवले होते? ३ सामने खेळून तो खरोखरच इतका थकला होता का की त्याला विश्रांती देण्यात आली होती? गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघ व्यवस्थापन त्याची चाचणीच घेत आहेत. तुम्ही त्याची परीक्षा घेत राहिल्यास तो संघाचा भाग कसा बनवणार? इशानने गेल्या दोन वर्षात किती सामने खेळले आहेत? टीम इंडियाची ही समस्या आजची नाही, खूप जुनी आहे. आम्ही खेळाडूंची योग्य निवड करत नाही पण त्यांचे सहज रिजेक्शन करतो,''असेही जडेजा म्हणाला.