Join us  

रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या मालिकेत तरी दिसणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:20 PM

Open in App

भारतीय संघ बुधवारी १६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीसंदर्भातील महत्त्वाची माहिती देखील दिली आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेला मुकलेला मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या मालिकेत तरी दिसणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. या प्रश्नाच उत्तर खुद्द रोहित शर्मानं दिलं आहे.  

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत खेळणार?  

बंगळुरु कसोटी आधी रोहित शर्मानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने भारतीय जलगदती गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसवर भाष्य केले. मोहम्मद शमी अजूनही शंभर टक्के फिट नाही, अशी माहिती भारतीय कर्णधाराने दिली. जोखीम पत्करून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचं नाही, असंही त्याने सांगितले. याचा अर्थ मोहम्मद शमीला कमबॅकसाठी आणखी काही वेळ लागणार हे स्पष्ट झाले आहे.

वर्ल्ड कप फायनलच्या रुपात खेळला शेवटचा सामना 

मोहम्मद शमीने नोव्हेंबरमध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. २०२३ मध्ये भारतात पार पडलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने खास छाप सोडली होती. या स्पर्धेतील पहिल्या ४ सामन्यात त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली होती. पण ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्याने कमाल करुन दाखवली. कमी सामने खेळून सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला. पण या स्पर्धेत दुखापत घेऊन खेळणं त्याला चांगलेच महागात पडले आहे.  

फिटनेस सिद्ध करण्याची पुन्हा पहिल्यापासून सुरुवात

रोहित म्हणाला की, तो शंभर टक्के फिटनेसच्या अगदी जवळ होता. पण गुडघ्यांना सूज येण्याची समस्या उद्भवल्यामुळे पुन्हा त्याला फिटनेसची कसर पहिल्यापासून सुरु करावी लागली. दुखापतीतून सावरण्याचे एक नवे चॅलेंज त्याच्यासमोर उभे राहिले. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिजिओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीकाळी रिकव्हरी प्रक्रिया फॉलो करत आहे, असेही रोहित शर्मानं म्हटले आहे.

जोखीम नकोच!

सर्वोत्तम स्तरावरील क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी त्याला आधी शंभर टक्के फिट व्हावे लागेल. तो लवकरात लवकर फिट व्हावा अशीच आमची इच्छा आहे. पण सध्याच्या परिस्थितीत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जाण्याची जोखीम आम्हाला घ्यायचीच नाही.  मोठ्या कालावधीनंतर कमबॅक करताना गोलंदाजासाठी एक वेगळे चॅलेंज असते. तो फिटनेसची प्रक्रिया पार करून मगच खेळायला येईल, यावरही रोहितनं भर दिला. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियारोहित शर्मामोहम्मद शामी