Join us  

'आम्ही २०-२५ धावा अधिक दिल्या'; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने त्याच्यावर फोडलं खापर

फलंदाजांकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २१ धावांनी पराभव झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 11:43 AM

Open in App

फलंदाजांकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २१ धावांनी पराभव झाला. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावांची मजल मारली. यानंतर किवींनी भारताला २० षटकांत ९ बाद १५५ धावांमध्ये रोखले.

लक्ष्याचा पाठलाग करताना अडखळलेल्या भारताला सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी चौथ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी करून सावरले. परंतु दोघेही पाठोपाठच्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर भारताचा पराभव स्पष्ट झाला. सूर्यकुमारने ३४ चेंडूंत ६ चौकार व २ षट्कारांसह ४७, तर हार्दिकने २० चेंडूंत एक चौकार व एका षट्कारासह २१ धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने २८ चेंडूत ५ चौकार व ३ षट्कारांसह ५० धावा फटकावत भारताच्या विजयाच्या अंधुक आशा निर्माण केल्या. परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याची झुंज व्यर्थ ठरली. मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर आणि लोकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

तत्पूर्वी, डीवोन कॉन्वे आणि डेरील मिचेल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने आव्हानात्मक मजल मारली. कॉन्वेने ३५ चेंडूंत ७ चौकार व एका षट्कारासह ५२ धावा केल्या. मिचेलने ३० चेंडूंत ३ चौकार आणि ५ षट्कार मारताना नाबाद ५९ धावा फटकावल्या. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कॉन्वे-मिचेल यांनी संघाला सावरले. कॉन्वे बाद झाल्यानंतर मिचेलने अखेरपर्यंत नाबाद राहत भारतीयांवर हल्ला चढवला. त्याने अखेरच्या षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला तीन षट्कार आणि एका चौकारासह २७ धावांचा निर्णायक चोप दिला. वॉशिंग्टन सुंदरने दोन, तर अर्शदीप, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने किवींविरुद्ध तब्बल सात गोलंदाज वापरले.

पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान कर्णधार हार्दिक पंड्या काय म्हणाला, इथल्या खेळपट्टीवर चेंडू इतका टर्न होईल याची मला कल्पनाही नव्हती. हार्दिक म्हणाला, ही विकेट अशी खेळेल असे कोणालाच वाटले नव्हते. यामुळे दोन्ही संघ आश्चर्यचकित झाले. न्यूझीलंडने आज चांगले क्रिकेट खेळले. जुन्या चेंडूपेक्षा नवीन चेंडू जास्त फिरत होता. चेंडू ज्याप्रकारे फिरत होता आणि उसळी घेत होता त्याप्रमाणे आम्हाला आश्चर्य वाटले, पण जोपर्यंत सूर्या आणि मी फलंदाजी करत होतो तोपर्यंत आम्ही पाठलाग करू असे आम्हाला वाटले, मात्र तसे झाले नाही, असं हार्दिक पांड्या म्हणाला. 

तसेच न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करताना आम्ही २०-२५ धावा अधिक दिल्या. आम्ही खराब गोलंदाजी केली. सध्याचा आमचा युवा संघ आहे आणि आम्ही विचार करुन त्यावर नक्की काम करु, असं हार्दिकने सांगितले. वॉशिंग्टन सुंदरच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने हार्दिक पंड्याही प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, सामना भारत-न्यूझीलंडमध्ये नाही, तर वॉशिंग्टन सुंदर आणि न्यूझीलंडमध्ये होता किवी टीम फक्त सुंदर विरुद्ध खेळत होती, असं हार्दिक पांड्या म्हणाले. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याभारत
Open in App