Join us  

हैदराबादला नमविण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही - एबी डिव्हिलियर्स

गुरुवारी बंगळुरुत सनरायझर्स हैदराबादला नमविण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. असे न झाल्यास आयपीएल जिंकण्याच्या मोहिमेचा सूर्यास्त होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 4:38 AM

Open in App

एबी डिव्हिलियर्स लिहितो...गुरुवारी बंगळुरुत सनरायझर्स हैदराबादला नमविण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. असे न झाल्यास आयपीएल जिंकण्याच्या मोहिमेचा सूर्यास्त होईल. आरसीबी लक्ष्याचा बचाव करण्यासाठी सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध विजय नोंदवू शकेल? मागच्या आठवड्यापर्यंत सनरायझर्सने चार वेळा आधी फलंदाजी केली. त्यावेळी ११८, १३२, १४६ आणि १५१ अशी साधारण धावसंख्या नोंदविल्यानंतरही या संघाने चारही सामने जिंकले. त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आयपीएल संघांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे.रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सर्वोच्च १७९ धावा उभारल्या. हा सामनाही ते जिंकतील, असा अनेकांचा समज होता. आयपीएलमध्ये मात्र काहीही शक्य आहे. अंबाती रायुडू आणि शेन वॉटसन यांनी समर्पित तसेच आक्रमक फलंदाजीचा परिचय देत चेन्नईला सहजपणे लक्ष्य गाठून दिले. लहान धावसंख्येचा बचाव करणारा संघ मोठ्या धावसंख्येचाही बचाव करू शकला नाही.सनरायझर्स संघ सहजपणे आयपीएलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेला नाही, हे समजून घ्यावे लागेल. त्यांच्याकडे केन विलियम्सनसारखे शानदार नेतृत्व आहे. या संघात प्रतिभा, समर्पितपणा आणि टक्कर देण्याची वृत्ती आहे, चिन्नास्वामीवर ते आमच्यापुढे आव्हान सादर करतील पण चेन्नईने दाखवून दिले की हैदराबादलादेखील नमविले जाऊ शकते. आयपीएलमध्ये कधीही पारडे फिरू शकते. एका पराभवानंतर अनेक शंका उपस्थित होतात. दुसरीकडे एक-दोन विजयानंतर आत्मविश्वासही उंचावतो. या स्पर्धेत लौकिकानुसार कामगिरी झाली नाही पण कसेतरी स्पर्धेत आहोत.केकेआर आणि दिल्लीच्या विजयामुळे आमच्यातही आनंद संचारला. या बळावर सनरायझर्सवर विजय मिळवायचा आहे. या मोसमातील स्थानिक मैदानावर हा अखेरचा सामना असेल. त्यामुळे आक्रमक गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे आमचे उद्दिष्ट असेल. आठवडाभरापासून आम्ही नॉकआऊट क्रिकेट खेळत आहोत. तथापि, संपूर्ण ऊर्जा आणि फोकस असेल तो सनरायझर्सविरुद्ध. त्यानंतर काय होते, ते बघू. (टीसीएम)

 

टॅग्स :आयपीएल 2018