भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध मागील १० वर्षांपासून ताणलेले गेलेले आहेत. दोन्ही देशांमधील राजकीय तणाव लक्षात घेता, यात सुधारणा होईल अशी अपेक्षाही नाही. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ( PCB) सातत्याने भारत-पाकिस्तान सामन्यांची मागणी केली जातेय... सध्याच्या घडीला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या लढती या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये किंवा आशिया चषक स्पर्धेतच होत आहेत. २०१२-१३मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात अखेरची मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. त्यानंतर फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन एहसान मणी ( Ehsan Mani) यांनी BCCI वर टीका केली आहे. ''सध्याची बीसीसीआय हे भाजपा सरकार चालवत असल्याचा दावा त्यांनी केला. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आहे, हे सर्वांना माहित्येय. परंतु सचिव कोण आहे याचीही सर्वांना चांगलीच कल्पना असेल?; अमित शाह यांचा मुलगा जय... बीसीसीआयचे खजिनदार हेही भाजपाच्या मंत्रीचा भाऊ आहे. त्यामुळे बीसीसीआयचा कारभार हा भाजपा सरकार चालवत आहे आणि त्यामुळेच भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका शक्य नाही. मी त्यांच्या मागेमागे करणार नाही, मला आमचा आत्मसन्मान गहाण ठेवायचा नाही,''असे एहसान मणी म्हणाले.
क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत मणी यांनी हे आरोप केले. ते पुढे म्हणाले, जर भारताला आमच्याविरुद्ध खेळायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात यावं. आम्ही त्यांना नकार देणार नाही, परंतु आमचाही आत्मसन्मान आहे. मग आम्ही का त्यांच्या मागे पळावं?, आम्ही ते करणार नाही. जेव्हा त्यांची तयारी असेल तेव्हाच आम्ही तयारी दाखवू.
PCBचे सध्याचे चेअरमन रमीझ राजा यांनी चार देशीय ट्वेंटी-20 मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. यात भारत-पाकिस्तान यांच्यासह इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचाही समावेश असावा असा प्रस्ताव त्यांनी आयसीसीसमोर मांडला. पण, तो नामंजुर केला गेला.