नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर करण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला संघ जाहीर केला. आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाने शानदार कामगिरी केली होती. लक्षणीय बाब म्हणजे दुखापतीमुळे आशिया चषकाला मुकलेल्या शाहिन शाह आफ्रिदीचे टी-20 विश्वचषकासाठी पुनरागमन झाले आहे. आफ्रिदीच्या येण्याने पाकिस्तानची गोलंदाजी अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र पाकिस्तानच्या संघातून काही बड्या चेहऱ्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये संघाचा प्रमुख खेळाडू शोएब मलिकचा (Shoaib Malik) देखील समावेश आहे.
दरम्यान, अलीकडेच शोएब मलिकने पाकिस्तानच्या संघ निवड समितीवर टीका केली होती. पाकिस्तानचा आशिया चषकाच्या फायनलमध्ये पराभव होताच मलिकने म्हटले होते, "मैत्री, आवड-नापसंत या संस्कृतीतून आपण कधी बाहेर पडू? अल्लाह नेहमी प्रामाणिक लोकांना मदत करतो." अशा शब्दांत मलिकने पाकिस्तान संघ निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते.
पाकिस्तानचा संघ जाहीर झाल्यानंतर पीसीबीने शोएब मलिकला का वगळले याबाबत स्पष्ट सांगितले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांनी म्हटले, "शोएब मलिकची टी20 वर्ल्डकप 2021 मध्ये निवड करणे आवश्यक होते म्हणून आम्ही त्याला निवडले. मात्र आता आम्ही सर्वोत्तम उपलब्ध खेळाडू निवडले आहेत."
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.
पाकिस्तानचे विश्वचषकातील सामने
23 ऑक्टोबर - वि. भारत, मेलबर्न
27 ऑक्टोबर - वि. ब गटातील विजेता, पर्थ
30 ऑक्टोबर - वि. अ गटातील उपविजेता, पर्थ
3 नोव्हेंबर - वि. दक्षिण आफ्रिका, सिडनी
6 नोव्हेंबर - वि. बांगलादेश, एडिलेड
Web Title: We have selected the best available players in the current squad, PCB said of not giving chance to Shoaib Malik
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.