Join us  

येणाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करायलाच हवा...

‘निवृत्ती’ या शब्दावरून गदारोळ सुरू झाला आहे. या वादामुळे  महान  सुनील गावसकर यांची आठवण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 7:00 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेडसहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

‘निवृत्ती’ या शब्दावरून गदारोळ सुरू झाला आहे. या वादामुळे  महान  सुनील गावसकर यांची आठवण झाली.  कारकीर्दीत यशोशिखरावर असताना, तसेच काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत असताना गावसकर यांनी पाकिस्तानविरुद्ध १९८७ ला बंगळुरू येथे अखेरची कसोटी खेळली.

त्या मालिकेत तो पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना होता.  २२१ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ मालिका आणि सामना वाचविण्यासाठी धडपडत होता. फिरकीपटूंसाठी नंदनवन मानल्या गेलेल्या खेळपट्टीवर चेंडू अलगद वळण घेत होता. भारताला चौथ्या डावात फलंदाजी करायची होती. सात फलंदाज दुहेरी आकडादेखील गाठू शकले नव्हते. गावसकर यांनी त्या खेळीत शानदार ९६ धावा ठोकल्या. एका वादग्रस्त निर्णयाचे ते बळी ठरले होते.  तरीही त्यांची ती खेळी किती मोलाची ठरली, याचा वेध या गोष्टीवरून घेता येईल की, त्या डावात दुसऱ्या सर्वोच्च २७ धावा अतिरिक्त धावांच्या रूपाने होत्या. अझहरुद्दीनने २६ धावा केल्या. गावसकर बाद होताच भारताने सामना १६ धावांनी गमावला.

अविस्मरणीय आणि ऐतिहासिक  खेळीसाठी त्यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अखेरचा सामना असेल, असे त्यांनी मनोमन ठरविले होते. तो निर्णय बदलला नाही, बॅट  किटमध्ये ठेवून कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ केले.

कसोटीशिवाय वन डेतदेखील गावसकर १९८७ च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नागपुरात ८३ चेंडूत अविस्मरणीय शतक ठोकून निवृत्त झाले. त्यांच्या कारकीर्दीत ते एकमेव वन डे शतक होते. गावसकरांचे उदाहरण देण्याचे कारण असे की, सध्या भारतीय क्रिकेटमध्ये ३५ वर्षांच्या जवळपास असलेल्या खेळाडूंची कामगिरी ढेपाळत आहे, तरीही ते निवृत्तीच्या योजनेत चालढकल करतात. यामुळे ते चांगले असतीलही. मात्र, ‘महान’ ठरत नाहीत. महान खेळाडू तोच जो स्वत:बाबत नव्हे, तर संपूर्ण संघाचा विचार करतो.

पुजारा आणि रहाणे यांच्यासह वृद्धिमान साहा याची कामगिरी खालावत आहे. खराब फिटनेसमुळे संघात स्थान मिळविणे साहासाठी कठीण होत आहे. तो संघात परत येईल,असे वाटत नाही. ऋषभ पंत, ईशान किशन आणि लोकेश राहुल असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळेल,असा समज असेल तर तो चुकीचा ठरतो. गावसकर यांच्यापाठोपाठ सचिन तेंडुलकरने निवृत्तीची योजना योग्यवेळी आखली.  २०० वी कसोटी खेळून निवृत्त होईन, हे सचिनने २०१३ ला ठरविले होते. ७४ धावांच्या खेळीसह सचिनने कसोटी क्रिकेटला ‘रामराम’ ठोकला. काहीजण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम राहण्याची लालसा बाळगतात. आर्थिक लाभाचा हिशेब करतात. आता आयपीएलचाही विचार केला जातो. साधारण आणि महान खेळाडूंमध्ये हाच फरक आहे.

गावसकर किंवा तेंडुलकर यांच्यासारखी उंची गाठण्यासाठी मैदान आणि मैदानाबाहेत योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यात वैयक्तिक निर्णय आणि त्याग या गोष्टींचा देखील समावेश त्यात होतो. क्रिकेट हा सांघिक खेळ. या खेळात केवळ स्वत:साठी नव्हे तर येणाऱ्यांसाठीही सकारात्मक विचार जोपासावा लागतो. तुम्ही संघर्ष करीत असाल, मात्र आपल्या संघर्षाचा आणि त्यागाचा लाभ इतरांना व्हावा, हा विचार बाळगलाच पाहिजे. कुणीतरी म्हटलेच आहे,‘ठोकरें खाइए , पत्थर भी हटाते रहिए, आने वालों के लिए राह बनाते रहिए.

टॅग्स :सुनील गावसकरसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App