भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) नुकतीच ५ खेळाडूंच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले. जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर आगामी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपासून पुनरागम करतील अशी अपेक्षा आहे, तर लोकेश राहुल आशिया चषक व वर्ल्ड कपपूर्वी तंदुरुस्ती होईल, असा अंदाज आहे. यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याच्या प्रकृतीत सुधारणा पाहून बीसीसीआय थक्क झाले आहेत आणि तो कदाचित वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळू शकेल, असा त्यांना विश्वास आहे. कार अपघातात रिषभला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, रिषभ झटपट बरा होत असल्याचे व्हिडीओ त्याने पोस्ट केले होते.
रिषभच्या अनुपस्थितीत इशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले. दुसऱ्या कसोटीत इशानने अर्धशतक झळकावले. कसोटी संघातील स्थानासोबतच इशानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघासाठीही विचार केला जातोय आणि लोकेश राहुल वेळेत तंदुरुस्त न झाल्यास इशान ही पहिली पसंती असेल. दरम्यान, रिषभच्या पुनरागमनावर सर्व अवलंबून आहे. रिषभला अपघातामुळे आयपीएल २०२३ आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळता आले नव्हते. आशिया चषक स्पर्धेतही त्याचे खेळणे अवघड आहे.
अशात रिषभ पंत वर्ल्ड कप सोडा, आयपीएल २०२४मध्येही खेळण्याची शक्यता कमीच असल्याचा दावा भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने केला आहे. तो म्हणाला,'' पुढच्या आयपीएलमध्येही रिषभ पंत खेळेल याची शक्यता कमीच आहे, कारण त्याची दुखापत लहान नाही. त्याचा खूप गंभीर अपघात झाला आहे. त्याने आता फलंदाजी आणि यष्टिरक्षणाला सुरूवात केली आहे. गंभीर अपघातातून पुनरागमन करणे सोपी गोष्ट नाही, विशेष करून यष्टिरक्षक व फलंदाजासाठी.''
भारतासाठी १०० कसोटी सामने खेळलेल्या इशांतने २०२३ वर्ल्ड कप स्पर्धेत रिषभच्या भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता नाकारली आहे. “चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली नाही. जर त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली असती तर तो आणखी जास्त काळ बाहेर राहिला असता. त्याच्यावर आता एक शस्त्रक्रिया झाली आहे, पण तो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निश्चितपणे तंदुरुस्त असेल, असे मला वाटत नाही. तो आयपीएल २०२४साठी तंदुरुस्त झाला तर ते खूप चांगले होईल,” असे इशांत म्हणाला.