नवी दिल्ली : गौतम गंभीर त्याच्या स्पष्टवक्ते स्वभावामुळे अनेकदा चर्चेत असतो. पुन्हा एकदा त्याने भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंच्या स्टेट्सबद्दल मोठा गोप्यस्फोट केला आहे. काही भारतीय खेळाडूंना 1983 विश्वचषकाच्या आठवणी इतिहासजमा करायच्या आहेत असे मोठे विधान गंभीरने केले आहे. तसेच भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची पूजा करणं थांबवायला हवं असा चपराक देखील त्याने लगावला. एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण संघावर आणि त्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यांनी संघासाठी योगदान दिले आहे, असे गंभीरने अधिक म्हटले.
गौतम गंभीरने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटले, "ड्रेसिंग रूममध्ये स्टार किंवा हिरो तयार करू नका, कोणतीच व्यक्ती स्टार नसून भारतीय क्रिकेटच खरा हिरो असला पाहिजे. आपल्याला कोणत्याही खेळाडूला मोठे करण्यापेक्षा संपूर्ण संघाला मोठे करायला हवे". असे सूचक विधान गौतम गंभीरने केले आहे.
वर्ल्ड कप विजयाची आठवण पुसायची आहे - गंभीरभारतीय संघातील काही खेळाडूंना 1983 च्या विश्वचषकाच्या आठवणी पुसायच्या आहेत असा दावा देखील गंभीरने केला. "2011 च्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी 2-3 वरिष्ठ खेळाडू मला म्हणाले की, आम्हाला विश्वचषक जिंकणे आवश्यक आहे कारण आम्हाला 1983 च्या विश्वचषकाचे सततचे संभाषण दूर करायचे आहे. आम्हाला त्यांची संपूर्ण गोष्टच मिटवायची आहे. मी त्यांना सांगितले की आम्हाला आमच्या देशाला आनंद देण्यासाठी विश्वचषक जिंकण्याची गरज आहे", इंडियन एक्सप्रेसशी बोलताना गंभीरने हा मोठा गौप्यस्फोट केला.
भारतीय क्रिकेटमधील हिरो संस्कृती बंद व्हायला हवी भारतीय क्रिकेटमधील हिरो संस्कृतीबद्दल गौतम गंभीरने म्हटले, दोन कारणांमुळे क्रिकेटमधील हिरो संस्कृती वाढली आहे. पहिले तर सोशल मीडियावरील फॉलोअर्स, जी कदाचित या देशातील सर्वात बनावट गोष्ट आहे, कारण तुमचे फॉलोअर्स किती आहेत यावरून तुम्ही हिरो ठरवू शकता. कारण त्यातूनच ब्रँड बनत असतो. एकूणच गंभीरने फॉलोअर्सच्या संख्येवरून खेळाडूंना जज करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.