नॉटींगहम : केरळची भयावह स्थिती पाहता देशभरातून केरळला मदत पुरविण्यात येत आहे. खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच केरळसाठी मदत उभारण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारनेही 500 कोटींची मदत जाहीर केली असून बहुतांश राज्य सरकारनेही रोख रक्कम मदत म्हणून दिली आहे. तर आमदार आणि खासदारांनाही आपला एक महिन्याचा पगार केरळसाठी दिला आहे. त्यातच, आता केरळच्या मदतीसाठी टीम इंडियाही पुढे सरसावली आहे
भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. मात्र, इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या विराट संघाचे देशातील पूरस्थितीवर बारीक लक्ष आहे. त्यामुळेच टीम इंडियाने आपला पहिला विजय केरळमधील पूरस्थितीत जीम गमावलेल्या नागरिकांना समर्पित केला आहे. तसेच टीम इंडियातील खेळाडूंनी आपले मानधनही केरळ्या पूरग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून देऊ केले आहे. त्यानुसार टीम इंडियाकडून केरळसाठी 1 कोटी 26 लाखांची मदत देण्यात आली आहे.
भारतीय संघ म्हणून आम्ही आजचा विजय केरळच्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्या देशवासियांना समर्पित करत आहोत. या महापुरात केरळमधील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. अनेकांचे घरदार उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे आम्ही केरळमधील आपतग्रस्तांसाठी जे शक्य होईल, ते करत असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सामना जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनीही विराट कोहलीने आजचा विजय देशाला समर्पित केल्याचे म्हटले आहे. तसेच इंग्लंडच्या संघानेही केरळच्या दु:खात सहभागी असून केरळबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्याचे विजयन यांनी सांगितले.