ख्राईस्टचर्च : ‘टी-२० क्रिकेटच्या अतिप्रभावामुळे क्रिकेटच्या इतर दोन प्रकारांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच कोरोनामुळे मिळालेल्या विश्रांतीमध्ये क्रिकेटच्या भविष्याविषयी विश्लेषण करण्यात आले पाहिजे,’ असे स्पष्ट मत न्यूझीलंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन टर्नर यांनी व्यक्त केले.एका वृत्तसंस्थेच्या माध्यमातून न्यूझीलंडच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष राहिलेले ७२ वर्षीय टर्नर यांनी म्हटले की, ‘सध्या पैशांचा बोलबाला असून तुम्ही टी-२० सामन्यांचा दबदबा इतका केला आहे की, क्रिकेटच्या अन्य प्रकारांना खूप मागे टाकण्यात आले आहे. माझ्या मते, हे दोन्ही प्रकार टी-२०च्या तुलनेत अधिक उपयुक्त आहेत. टी-२०च्या माध्यमातून मिळत असलेल्या पैशांमुळे असे होत असून या प्रकारामुळे अनेक लोकांमध्ये क्रिकेटची आवड निर्माण होत आहे.’सध्या कोरोनामुळे मिळालेल्या विश्रांतीदरम्यान क्रिकेटच्या भविष्याबाबत विचार करण्यात यावा, असे सांगताना टर्नर म्हणाले की, ‘सर्वोच्च स्तरावर अधिक प्रमाणात पैसा जात असून हे एका समाजाप्रमाणे आहे, जिथे श्रीमंत आणि गरीब लोकांमधील अंतर आणखी वाढत चालले आहे. त्यामुळेच आपण आशा करू शकतो की, या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी योग्य ते विश्लेषण करण्यात येईल.’खेळाडूही सध्या अधिक प्रभावी ठरत असल्याचे नमूद करताना टर्नर यांनी सांगितले की, ‘आज जवळपास सर्व ताकद खेळाडूंच्या हातात आली आहे आणि यामध्ये बोर्ड मागे पडत असल्याचे दिसते आहे. वरिष्ठ खेळाडूंना अधिकाधिक संचलन करण्याची संधी देण्यात येत असल्याचे दिसत आहे. ही नक्कीच आदर्श स्थिती नाही.’ दरम्यान, यावेळी टर्नर यांनी गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आल्याच्या नियमावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- क्रिकेटच्या भविष्याबाबत विश्लेषण केले पाहिजे - टर्नर
क्रिकेटच्या भविष्याबाबत विश्लेषण केले पाहिजे - टर्नर
सध्या कोरोनामुळे मिळालेल्या विश्रांतीदरम्यान क्रिकेटच्या भविष्याबाबत विचार करण्यात यावा, असे सांगताना टर्नर म्हणाले की, ‘सर्वोच्च स्तरावर अधिक प्रमाणात पैसा जात असून हे एका समाजाप्रमाणे आहे, जिथे श्रीमंत आणि गरीब लोकांमधील अंतर आणखी वाढत चालले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:29 PM