भारताचे क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या टेन्शनबद्दल सांगितले. खेळाडूंसाठी दुखापतीची डोकेदुखी नवीन नाही आणि आता यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळत नाही आणि त्यानंतर दीपक चहर देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. टीम इंडियाकडे सध्या वेगवान गोलंदाच्या रुपात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल आहेत.
जेव्हा आपल्या प्रमुख खेळाडूंना दुखापतींमुळे बाहेर जावे लागते तेव्हा प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ही सर्वात निराशाजनक गोष्ट ठरते. भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त असताना आम्ही दोन वेळा इंग्लंड आणि न्यूझीलंडचा दौरा केला आहे. तो त्या दौऱ्यांवर गेला असता तर त्याला भरपूर विकेट मिळाल्या असत्या. आता दीपक चहरकडे बघा. तो फार कमी सामने खेळला आहे आणि त्याला दुखापत झाली आहे, असे शास्त्री मुंबई प्रेस क्लबच्या मीट द मीडिया या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
“मी स्टॅट्स पाहत होतो. बुमराहने टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर पाचच टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. तोदेखील दुखापतग्रस्त आहे. आजकाल जितक्या प्रमाणात क्रिकेट खेळले जात आहे, हे पाहणे गरजेचे आहे की खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट योग्य प्रकारे केले गेले पाहिजे. त्यांना आराम दिला गेला पाहिजे. यात बीसीसीआय अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. जर कोणत्या भारतीय खेळाडूला आयपीएलमध्ये काही सामन्यांसाठी आराम आवश्यक असेल, तर त्याला तो मिळाला पाहिजे. बीसीसीआयला फ्रेन्चायझींसोबत बसायला हलं आणि त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावायला हवी,” असेही ते म्हणाले.