मुंबई : ‘टी२० मुळे क्रिकेटचा खेळ नक्कीच रोमांचक झाला, पण त्याच वेळी कसोटी क्रिकेटचा स्तरही कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने व्यक्त केले.ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिलांची टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू असून, यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथेच पुरुषांची टी२० विश्वचषक स्पर्धा रंगेल. या निमित्ताने टुरिझम ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मॅकग्रा मुंबईत उपस्थित होता. यावेळी त्याने कसोटी क्रिकेटविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, ‘दिवस-रात्र कसोटी सामन्यांची कल्पना खूप चांगली असून, मला अशा प्रकारचे सामने खूप आवडतात. यामुळे कसोटी क्रिकेटसाठी पुन्हा मोठी गर्दी होऊ लागली आहे. टी२०मुळे नक्कीच खेळ रोमांचक झाला, पण त्याच वेळी कसोटीवरही लक्ष दिले गेले पाहिजे. हा चांगला प्रयोग होता, पण चार दिवसीय सामन्यांची संकल्पना चांगली नाही. पाच दिवसांचा सामना हेच खरे कसोटी क्रिकेट आहे. खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी दिवस-रात्र कसोटी सामना सर्वोत्तम प्रयोग आहे.’महिला क्रिकेटविषयी मॅकग्रा म्हणाला की, ‘महिलांच्या विश्वचषकामुळे नक्कीच मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्येही मोठ्या प्रमाणात मुली क्रिकेटकडे वळाल्या आहेत. बिग बॅशच्या माध्यमातून युवा महिलांना मोठी संधी मिळाली असून, अनेक गुणवान खेळाडू समोर आले आहेत. आज ऑस्ट्रेलिया महिला संघ जागतिक क्रमवारीत अव्वल आहेत. भारतीय महिलाही चांगल्या प्रकारे खेळत असून, मला दोन्ही महिला व पुरुष टी२० स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा अंतिम लढतीची अपेक्षा आहे.’ तसेच, ‘ऑस्ट्रेलियात तुम्हाला केवळ ऑसी संघाविरुद्ध खेळावे लागत नाही, तर संपूर्ण देशाविरुद्ध खेळावे लागते, पण जेव्हा भारतीय संघ इथे खेळत असतो, तेव्हा जणू सामना भारतात सुरू असल्याचे भासते. भारतीय पाठीराख्यांचा उत्साह, त्यांचा जोश जबरदस्त असतो.’बुशफायर आपत्तीतून सावरण्यासाठी क्रीडाविश्वाने ऑस्ट्रेलियाला मोठी मदत केली. यामुळे प्रत्येक ऑसीला नवा आत्मविश्वास मिळाला. माझ्यामते, खेळाची हीच गोष्ट शानदार आहे. खेळ सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडतात आणि त्यामुळेच जगातील प्रत्येक कोपऱ्यातून बुशफायर आपत्तीसाठी मदत मिळाली. अनेक खेळांतील विशेष सामन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उभी केली गेली. एक खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे.- ग्लेन मॅकग्रा
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कसोटीचा स्तर कायम राखण्याचा प्रयत्न व्हावा- ग्लेन मॅकग्रा
कसोटीचा स्तर कायम राखण्याचा प्रयत्न व्हावा- ग्लेन मॅकग्रा
टी२०मुळे क्रिकेटमध्ये रोमांचकता आली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 2:12 AM