दुबई : ‘स्मृती मानधनासोबत डावाची सुरुवात करण्याची वेगळीच मजा आहे. आमच्यामधील ताळमेळ खूप चांगला असून आम्ही एकमेकींच्या चेहऱ्यांवरील हावभाव पाहूनच स्थिती सांभाळून घेतो,’ असे भारताची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिने सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यशात सलामी जोडीची भूमिका मोलाची ठरली आहे. एका मुलाखतीमध्ये शेफालीने सांगितले की, ‘गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी स्मृतीसोबत डावाची सुरुवात करत आहे. आता आम्ही एकमेकींच्या चेहऱ्यांवरील हावभाव पाहून त्यानुसार सहजपणे खेळतो. आम्हाला एकमेकींची ताकद आणि कमकुवतपणा माहीत आहे. आम्ही कायम सकारात्मकतेनेच खेळतो.’
शेफाली पुढे म्हणाली, ‘संघासाठी आमची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे आम्ही जाणतो. विशेष करून पॉवर प्लेदरम्यान आमची फटकेबाजी महत्त्वाची ठरते. त्यामुळेच आम्ही सर्वोत्तम कामगिरीच्या प्रयत्नात असतो. स्मृतीदीदीचे टायमिंग जबरदस्त आहे आणि डावात सूत्रधाराची भूमिका निभावणे तिला जमते. तिची हीच गोष्ट मला आवडते.’
‘हरमनप्रीतचे स्वप्न साकार झाले पाहिजे’शेफालीने कर्णधार हरमनप्रीत कौरबाबत सांगितले की, ‘हरमनप्रीत दीदी खेळाप्रति खूप जिद्दी आहे. विश्वचषक पटकावणे हे तिचे स्वप्न आहे आणि आशा करते की, तिचे हे स्वप्न साकार व्हावे. ती महान खेळाडू आहे आणि शानदार कर्णधार आहे. हरमन आम्हाला कायम प्रेरित करते.’