मेलबोर्न : कसोटीतून निवृत्त होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा सलमीवीर डेव्हिड वॉर्नर हा भारत दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत हरवू इच्छितो. याशिवाय त्याला २०२३ची ॲशेस मालिका इंग्लंडमध्ये जिंकायची आहे. ॲशेस मालिकेत १३ दिवसात ३-० अशी विजयी आघाडी मिळविल्यानंतर ३५ वर्षांच्या वॉर्नरने माझे काम अद्याप संपलेले नाही, असा सूचक इशारा दिला.
वॉर्नर हा यंदाच्या टी-२० विश्वचषकात ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ बनला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच ही स्पर्धा जिंकली होती. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना वॉर्नर म्हणाला,‘ आम्ही भारताला भारतात अद्यापही पराभूत केलेले नाही. आम्ही असे करू इच्छितो. याशिवाय इंग्लंडमध्ये २०१९ची ॲशेस मालिका अनिर्णीत राहिली होती, मात्र २०२३ची मालिका जिंकू असा विश्वास आहे.’
इंग्लंडमध्ये तीन मालिकेत १३ आणि भारतात दोन मालिकांत आठ कसोटी सामने खेळलेल्या वॉर्नरचा दोन्ही देोशात खराब रेकॉर्ड राहिला. त्याने क्रमश: २६ आणि २४ च्या सरासरीने धावा केल्या. त्यात एकाही शतकाची नोंद करू शकला नाही. पुढच्या ॲशेस मालिकेपर्यंत तो ३७ वर्षांचा होईल. मात्र त्याच्या मते वय हा केवळ आकडा आहे. ‘जेम्स ॲन्डरसन याने अधिक वयाच्या खेळाडूंसाठी आदर्श घालून दिला. मी स्वत:कडून धावा काढण्याची कुठलीही संधी सोडणार नाही. फॉर्ममध्ये असल्याने नव्या वर्षांत आणखी एक धडाकेबाज खेळीची प्रतीक्षा आहे,’ असे वॉर्नरने सांगितले.
इंग्लंडने कृत्रिम खेळपट्ट्यांवर सराव करावा : वॉर्नरचा सल्लाॲशेस मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने पराभवामुळे त्रस्त असलेल्या इंग्लंड संघाला मोलाचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्यासाठी त्यांनी कृत्रिम खेळपट्ट्यांवर सराव करावा, असे वॉर्नरने सुचविले आहे. वॉर्नर म्हणाला, ‘फलंदाजांच्या दृष्टीने खेळपट्टीवरील उसळी मोठे कारण ठरते. ऑस्ट्रेलियात वाढल्याने इंग्लिश खेळाडूंच्या तुलनेत आमच्यासाठी ही नवी बाब नाही. इंग्लिश खेळाडूंनी उसळी घेणाऱ्या चेंडूवर यशस्वी व्हायचे झाल्यास कृत्रिम खेळपट्टीवर सराव करायला हवा. इंग्लिश गोलंदाजांनी सुरुवातीच्या तीनही कसोटीत आखूड टप्प्याचा मार करीत चुका केल्या. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर असे डावपेच नेहमी फसवे ठरतात.’