वेस्ट इंडीज दौऱ्यातील दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात निवडीबाबत मुंबईचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालच्या मनात धाकधूक आणि उत्सुकता होती. कसोटी संघात नाव येताच वडील भावुक झाले. रडायला लागले... यशस्वीची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कोच ज्वालासिंग यांनी आपल्या शिष्याबद्दल २०१३ ला पाहिलेले स्वप्न दहा वर्षांनंतर साकार झाले.
उत्तर प्रदेशच्या भदोईतून क्रिकेटसाठी यशस्वी मुंबईत आला. वयाच्या ११ व्या वर्षी त्याने मुंबईत क्रिकेटला सुरुवात केली. दिवसभर क्रिकेट खेळायचे आणि आझाद मैदानाच्या बाहेर पाणीपुरी विकायची, हा त्याचा दिनक्रम होता. बऱ्याचदा मैदानात सामना पाहणारी माणसे त्याला ओळखायची आणि हे काय करतो, असेही विचारायची, त्यावेळी पोटासाठी करावं लागतं साहेब असं तो म्हणायचा. पण, क्रिकेटवर त्याची निष्ठा होती. क्रिकेट सोडायचे नाही, हे त्याने ठरवले. परिस्थिती प्रतिकूल होती. एका तंबूमध्ये त्याला तीन वर्षे राहावे लागले. काही वर्षांपासून स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारा यशस्वी हा आयपीएलमध्ये कामगिरीच्या बळावर अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला.
तो म्हणाला, 'एक- दोन दिवसांत विंडीज दौऱ्याच्या तयारीला लागणार आहे. त्यासाठी एनसीएकडे प्रस्थान यशस्वीला डब्ल्यूटीसी फायनलसाठी संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले होते. तो पुढे म्हणाला, 'आगामी दौऱ्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा माझा प्रयत्न असेल. मी उत्साही आहे; पण आपल्या पद्धतीनेच खेळणार.' राजस्थान रॉयल्सचे कोच कुमार संगकारा, याच संघातील सहकारी ट्रेंट बोल्ट आणि जो रूट या दिग्गजांसह भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी शानदार कामगिरी करणारा यशस्वी राष्ट्रीय संघातील समावेशाबाबत जैस्वालचे समर्थन केले होते. याविषयी यशस्वी म्हणतो, 'मी थोडा घाबरलो होतो. संघात नाव येईपर्यंत मनात धाकधूक होती. पण, कसोटी खेळायला मिळणार याची उत्सुकता आणि आनंद आहे.
जेव्हा माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा ते रडू लागले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा आता भारतासाठी खेळणार याचा आनंद त्यांना झाला होता. माझ्या कष्टाचे चीज होत आहे. असे त्यांना वाटत होते. पण, मी अद्याप आईला भेटलो नाही. मी सकाळी सरावासाठी बाहेर पडलो होतो. काही वेळाने मी माझ्या आईला भेटेन, - यशस्वी जैस्वाल