Join us  

आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम

India vs Pakistan : ९ तारखेला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान न्यूयॉर्कच्या मैदानात आमनेसामने असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 2:36 PM

Open in App

Babar Azam On T20 World Cup 2024 : पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषकातील आपला सलामीचा सामना ६ जून रोजी यजमान अमेरिकेसोबत खेळणार आहे. अमेरिकेने रविवारी कॅनडाचा पराभव करून विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे नवख्या अमेरिकेच्या संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही हे सर्वच संघांना माहीत आहे. ९ तारखेला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान न्यूयॉर्कच्या मैदानात आमनेसामने असतील. या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अशातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना बाबरने विश्वचषकाची रणनीती सांगितली. यावेळी तो म्हणाला की, विश्वचषक कसा जिंकता येईल यावर आमचे लक्ष आहे. केवळ भारताविरूद्ध विजय मिळवावा या हेतूने आम्ही इथे आलो नाही. आम्हाला संपूर्ण स्पर्धा जिंकायची आहे. भारताविरूद्ध एक सामना जिंकून चालणार नाही. 

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला तिथे एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. पावसाच्या व्यत्ययामुळे मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले. पण, दोन सामने जिंकून यजमान इंग्लंडने २-० ने मालिका खिशात घातली. ही मालिका संपताच पाकिस्तानी संघ अमेरिकेत दाखल झाला. आगामी विश्वचषकासाठी शनिवारी पाकिस्तानचे शिलेदार अमेरिकेच्या धरतीवर पोहोचले. 

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील

विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तान