सिडनी : भारताविरुद्ध १७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सराव सामने तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील, असे मत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कसोटी फलंदाज जो बर्न्सने व्यक्त केले. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध दोन तीन दिवसीय सराव सामने खेळायचे आहेत. पहिला सामना ६ डिसेंबरपासून तर दुसरा सामना ११ डिसेंबरपासून खेळल्या जाणार आहे.
बर्न्स म्हणाला, ‘नेहमी सामना जिंकण्यावर लक्ष असते. ऑस्ट्रेलिया ‘अ’तर्फे खेळतानाही आम्ही कसोटी मालिकेची तयारी व भारतावर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात राहू. भारतीय संघ फॉर्मात येऊ नये, यासाठीही प्रयत्नशील असतील.’बर्न्स म्हणाला, ‘जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. आम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल. सलामीवीराची भूमिका महत्त्वाची ठरेल. अनेकदा धावा फटकावण्यापेक्षा अधिक चेंडू खेळत दबाव कमी करणे आवश्यक असते. भारताकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे आणि ते कडवे आव्हान देतील.