भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) पंजाब किंग्जचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माच्या ( Jitesh Sharma) कामगिरीने खूप प्रभावित झाला आहे. सेहवाग म्हणाला की जितेशला ट्वेंटी-२० फलंदाजीची मूलभूत तत्त्वे सापडली आहेत आणि ते त्याचे पालन करत आहे. पुढील एक वर्षात जितेश भारतीय संघात खेळताना दिसणार असल्याचेही सेहवागने सांगितले. तो म्हणाला, “मी मुलांना नेहमी सांगतो की फक्त चेंडू पाहा आणि तुम्हाला चेंडू सोडायचा असेल, बचाव करायचा असेल किंवा सीमापार पाठवायचा असेल, हे तुम्ही ठरला. ही फलंदाजीची साधी मूलभूत माहिती आहे आणि जितेश तेच करत आहे.''
सेहवाग पुढे म्हणाला, “जितेश चेंडू पाहून खेळत होता. चेंडूला जोरदार फटके मारायचे होते, तर त्याने शॉट्स स्विंग केले तो अगदी सहजतेने फलंदाजी करत आहे. मात्र धावा काढण्यासाठी जितेशला खूप मेहनत करावी लागेल. खेळपट्टी चांगली होती, पण मुंबई इंडियन्सची गोलंदाजी चांगली नव्हती. जर मी १३ वर्षांखालील मुलांसोबत खेळलो तर कदाचित मी धावा करू शकणार नाही. धावा काढण्यासाठी मला त्यांच्यासारखे खेळावे लागेल. जितेशने येथे तेच केले. मुंबईची गोलंदाजी कमकुवत असतानाही त्याने धावांसाठी मेहनत घेतली. शॉटची निवड चांगली होती. जितेशकडे लक्ष दिले पाहिजे, असे मी याआधीही म्हटले आहे, कदाचित पुढील एका वर्षात तो भारताकडून खेळताना दिसेल.''
जितेश शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ४९ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. त्याने लिएम लिव्हिंगस्टोन ( ८२*) सोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र, या सामन्यात पंजाब किंग्जला विजयाची नोंद करता आली नाही. जितेशने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत २२ सामने खेळले आहेत आणि १६४.८१च्या स्ट्राइक रेटने ४७३ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल २०२३ मध्ये १०सामन्यांमध्ये २३९ धावा केल्या आहेत.