नवी दिल्ली ।
भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे, तिथे एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वेस्टइंडिजच्या संघाने मागील दोन वर्षांमध्ये एकदिवसीय सामन्यांमधील संपूर्ण ५० षटकं खेळण्यासाठी देखील संघर्ष केला आहे. अशा स्थितीत शुक्रवारपासून भारताविरूद्ध होणाऱ्या मालिकेत आम्ही याच्यात सुधारणा करू असा विश्वास वेस्टइंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने मागील तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडला ऑलआउट केलं होतं.
५० षटकं खेळण्याचा प्रयत्न करू - सिमन्स
सिमन्स यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला असता संघातील कमकुवत दुव्यांवर भाष्य केलं. "आमच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे ५० षटकं फलंदाजी कशी करता येईल याच्यावर आम्ही अभ्यास करत आहोत. आम्हाला डावात धावांची गती वाढवत आणि भागीदारी करत पूर्ण ५० षटकांपर्यंत फलंदाजी करायला हवी. फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून मोठी खेळी करावीच लागेल." असं फिल सिमन्स यांनी स्पष्ट केलं.
घरच्या मैदानावर मिळेल अधिक मदत
सिमन्स हे २०१९ पासून वेस्टइंडिजच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. भारतीय खेळपट्टीच्या तुलनेत विंडीजच्या धरतीवर त्यांच्या संघातील खेळाडूंना चांगली खेळी करण्यास मदत होईल अशी आशा सिमन्स यांना आहे. सिमन्स यांच्या म्हणण्यानुसार वेस्टइंडिजच्या संघाची गोलंदाजी आणि फिल्डिंग कमकुवत आहे.
"गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. फिल्डिंगमध्ये आम्ही आमच्या संघाला सर्वोत्तम लेखतो. संघातील गोलंदाज त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. असं झाल्यास आम्ही भारतीय संघातील फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखू आणि विजय मिळवू", असं वेस्टइंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी आणखी सांगितले.
५० षटकं खेळण्यासाठी संघर्ष
वेस्टइंडिजच्या संघानं २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर ३९ डावांमधील फक्त ६ डावांमध्येच पूर्ण ५० षटकं खेळली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी मागील १३ एकदिवसीय मालिकेतील ९ मालिका गमावल्या आहेत. याशिवाय यावर्षीच्या सुरूवातील वेस्टइंडिजला आपल्या घरच्या मैदानावर आयर्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
Web Title: We will try to play 50 overs in ODIs against India, said WI coach Phil Simmons
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.