लंडन : इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये तयारीबाबत भारतीय संघावर होत असलेल्या टीकेबाबत पाठराखण केली. सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेला भारतीय संघ यापेक्षा अधिक सराव करू शकत नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ ने पिछाडीवर आहे. तिसरा कसोटी सामना शनिवारपासून नॉटिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. बेलिस म्हणाले, ‘आॅस्ट्रेलिया, भारत व इंग्लंड यांच्यासारखे संघ बरेच क्रिकेट खेळतात. प्रत्येक संघ अधिक सराव सामने खेळण्यास इच्छुक असतो, पण हे शक्य नसते. खेळाडूंनाही विश्रांतीची गरज असते. अनेक खेळाडू सर्वच सामने खेळतील, पण यापेक्षा अधिक सराव सामन्यांची भर घालणे शक्य नसते.’
भारताने मालिकेपूर्वी एक सराव सामना खेळला. यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कठोर टीका केली होती की, भारतीय संघाला आणखी सराव सामने खेळायला हवे होते. यावर बेलिस म्हणाले, ‘आम्ही जेवढे सराव सामने असतात तेवढे खेळतो. त्यानंतर तयारी योग्य होती का, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही आणखी सराव सामने खेळण्यास इच्छुक असतो, पण आठवड्यात १० दिवस नसतात.’ इंग्लंडच्या कामगिरीबाबत बोलताना प्रशिक्षकांनी समाधान व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
अँडरसन जगातील सर्वोत्तम गोलंदाज...
बेलिस यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणाºया ख्रिस व्होक्सची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘व्होक्सला संघात मान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने फलंदाजी व गोलंदाजीवर बरीच मेहनत घेतली आहे. चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असलेल्या खेळाडूंमध्ये व्होक्सचा समावेश आहे. व्होक्समध्ये संघात अँडरसनचे स्थान घेण्याची क्षमता आहे. पण सध्या अँडरसन आणखी तीन-चार वर्षे खेळू शकतो. अशा परिस्थितीमध्ये जिम्मी अँडरसन जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. या परिस्थितीमध्ये त्याचा मारा खेळणे कुठल्याही फलंदाजाची परीक्षा असते. त्यामुळे आगामी तीन-चार वर्षे तो निवृत्त होईल, असे मला वाटत नाही. जोपर्यंत फिट आहे तोपर्यंत तो खेळू शकतो.’
Web Title: Week does not have ten days, England coach Bellis has supported Indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.