नवी दिल्ली : भारतीय संघाचे आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या सरकारकडून गांगुलींना झेड कॅटेगरीची सुरक्षा पुरवली जाणार आहे. खरं तर या आधी गांगुली यांना व्हाय (Y) श्रेणीच्या सुरक्षेचे कवच होते. मात्र, आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना झेड (Z) श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. सौरव गांगुली यांना दिलेली Y-श्रेणी सुरक्षा १६ मे रोजी संपली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गांगुलींच्या सुरक्षेत मोठी वाढझेड श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर आता सौरव गांगुलींसोबत ८ ते १० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तर Y श्रेणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांची ही संख्या ३ होती. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीचा डायरेक्टर आहे. लक्षणीय बाब म्हणजे दिल्लीचा संघ आयपीएल २०२३ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
कधीपासून मिळणार नवीन सुरक्षा?आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिप टप्प्यात येऊन पोहचला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने शेवटचा साखळी सामना खेळल्यानंतर संघाचे डायरेक्टर सौरव गांगुली कोलकाताला रवाना होतील. तिथे पोहोचताच त्यांना सरकारकडून देण्यात येणारी नवीन सुरक्षा दिली जाईल.
आयपीएल २०२३ चा हंगाम दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. डेव्हिड वॉर्नरच्या संघाला आपल्या सुरूवातीच्या पाचही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विजय मिळवून दिल्लीने विजयाच्या पटरीवर पुनरागमन केले पण त्यांना विजयरथ कायम ठेवता आला नाही. दिल्लीला बारा पैकी केवळ चार सामने जिंकण्यात यश आले असून आठ सामने गमवावे लागले आहेत.