पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने व्यावसायिक खेळाडू या नात्याने ‘मालामाल लीग’ खेळण्यासाठी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री ब्राव्होने निवृत्ती जाहीर केल्याने तो यापुढे वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये दिसणार नाही. विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी त्याचा विंडीज संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, आता त्याने घेतलेल्या अचानक निवृत्तीमुळे विंडीज संघाला धक्का बसला आहे.
३५ वर्षांच्या ब्राव्होने निवृत्तीसंदर्भात एक पत्रक काढले. तो म्हणाला, ‘क्रिकेटविश्वाला सांगू इच्छितो की, मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. १४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी पदार्पण केले होते. आजही मला तो क्षण स्पष्टपणे आठवतोय, जेव्हा जुलै महिन्यात २००४ साली इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस्वरील सामन्याआधी विडिंजची ‘मरुन रंगाची’ टोपी देण्यात आली होती. त्यावेळचा उत्साह व समर्पितता अखेरपर्यंत कायम राखल्याचा अभिमान आहे.’
युवांना संधी देण्यासाठी निवृत्त होत असल्याचे ब्राव्होने यावेळी म्हटले. ‘व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून अनेकांनी जो निर्णय घेतला तो मीही घेणे गरजेचे आहे. म्हणूनच नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी मैदान सोडत आहे.’
>दिग्गजांसोबत खेळण्याची मिळाली संधी
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणारा त्रिनिदादचा ब्राव्हो पुढे म्हणाला, ‘कारकीर्दीत मिळालेल्या यशात जे जे कारणीभूत आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. माझे कुटुंब आणि मी जिथे माझे क्रिकेटमधील कैशल्य शिकलो त्या क्विन्स पार्क क्रिकेट क्लबचे विशेष आभार.कारकिर्दीत जगभरातील क्रिकेट मैदानांवरील ड्रेसिंग रुम्स या खेळातील दिग्गजांबरोबर शेअर करू शकलो यासाठी स्वत:ला नशिबवान मानतो. यापुढे मी व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द सुरूच ठेवणार असून चॅम्पियनसारखाच चाहत्यांचे मनोरंजन करीत राहीन, असा विश्वास वाटतो, असेही ब्राव्होने पत्रकात म्हटले आहे. याचा अर्थ ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. 2014 मध्ये ब्राव्हो धर्मशाला येथे भारताविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. दरम्यान बोर्डासोबतचा वेतनवाद विकोपाला जाताच विंडीज संघ दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला, त्यावेळी ब्राव्हो संघाचा कर्णधार होता.
>ब्राव्होची कारकीर्द
कसोटी : सामने - ४०, धावा - २,२००, सरासरी - ३१.४२, बळी - ८६. सर्वोत्तम कामगिरी : ५५ धावांत ६ बळी
एकदिवसीय : सामने - १६४, धावा - २,९६८, सरासरी - २५.३६, बळी - १९९. सर्वोत्तम कामगिरी : ४३ धावांत ६ बळी.
टी-२० : सामने - ६६, धावा - १,१४२, सरासरी - २४.२९,
बळी - ५२. सर्वोत्तम कामगिरी : २८ धावांत ४ बळी
Web Title: West Indian all-rounder Dwayne Bravo retires
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.