Hayley Matthews Inspiration Fighting Spirit, Cricket News: सध्या भारतात IPL ची धूम सुरु आहे. त्यातही तिलक वर्मा आणि डेवॉन कॉनवे यांना रिटायर्ड आऊट केल्यानंतर याची चर्चा अधिकच वाढली आहे. महिला क्रिकेटमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला, ज्यात थोडा वेगळा शेवट दिसला. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने महिला विश्वचषक पात्रता फेरीत स्कॉटलंडविरुद्ध दमदार कामगिरी केली. तिने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. यादरम्यान तिला दुखापत झाली आणि स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले. तरीही मॅथ्यूजने हार मानली नाही. ती संघासाठी मैदानात परतली आणि नंतर वादळी शतक झळकावले.
प्रचंड वेदना पण जिद्द कायम...
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना २०२५ च्या महिला विश्वचषक पात्रता फेरीचा भाग होता. २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅथ्यूजला फलंदाजी करताना खूप त्रास होत होता, वेदनेमुळे कळही मारत होती. त्यामुळे, ९५ आणि ९९ च्या धावसंख्येवर ती दोनदा रिटायर हर्ट झाली. ४२ व्या षटकात तिला चक्क स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले. पण ती काही मिनिटांतच परत आली आणि तिने १०१ चेंडूत शतक पूर्ण केले. यामुळे वेस्ट इंडिजच्या आशा जिवंत राहिल्या होत्या. मॅथ्यूज शेवटपर्यंत झुंजत राहिली. तिने आलिया अलेनासोबत ३० धावांची भागीदारी केली. पण ४७ व्या षटकात फिरकी गोलंदाज अब्ताहा मकसूदने अलेनला बाद केले. मॅथ्यूज ११३ चेंडूत ११४ धावा करून नाबाद राहिली. पण त्यांनी ११ धावांनी सामना गमावला.
----
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने ४४ षटकांत २४५ धावा केल्या. त्यांनी चांगली सुरुवात केली. पण नंतर त्याचा डाव कोलमडला. एकेकाळी त्यांची धावसंख्या ३४ षटकांत १८२ धावांवर ४ विकेट अशी होती. पण नंतर त्यांना फक्त २४५ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात त्यांनी पहिली विकेट गमावली. कियाना जोसेफ लवकर बाद झाली. पण यानंतर, हेली मॅथ्यूज आणि जाडा जेम्स यांनी मिळून डावावर नियंत्रण मिळवले. दोघांनीही ११३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्कॉटलंडने एकामागून एक अनेक विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्यांना केवळ २३४ धावाच करता आल्या.