Join us  

कॅरेबियन वादळ! Nicholas Pooran च्या तडाख्यात Mohammed Rizwan चा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त

टी-२-० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता निकोलस पूरन हा नवा किंग झालाय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 3:57 PM

Open in App

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) हा यंदाचं वर्ष गाजवताना दिसतोय. कॅरेबियन लीगमध्ये खेळणाऱ्या या फलंदाजाची एका मागून एक खास विक्रमाची मालिकाच रचली आहे. ज्यात आणखी एका पराक्रमाची भर पडली आहे. निकोलस पूरन याने पाकिस्तानचा विकेट किपर बॅटर मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडित काढला. टी-२-० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता निकोलस पूरन हा नवा किंग झालाय. 

छोट्याखानी खेळीसह सेट केला मोठा विक्रम 

कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२४ स्पर्धेतील बार्बाडोस रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना त्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. या सामन्यात १५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह २७ धावांच्या अल्प खेळीसह पूरनं टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. 

यंदाच्या वर्षातील कामगिरी; IPL मध्येही सोडलीये खास छाप

यंदाचं वर्ष गाजवणाऱ्या निकोलस पूरन याने आतापर्यंत ६६ सामन्यातील ६६ डावात ४२.०२ च्या सरासरीने १४ अर्धशतकासह २ हजार ५९ धावा केल्या आहेत. १६०.८५ च्या स्ट्राइक रेटन या धावा करताना ९८ ही त्याच्या भात्यातून आलेली सर्वोच्च खेळी आहे. निकोलस पूरन हा क्रिकेट जगतातील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या हंगामात लखनऊ सुपर जाएंट्स संघाकडून खेळताना त्याने ६२.३७ च्या सरासरीने ४९९ धावा काढल्या होत्या.  ज्यात तीन अर्धशतकांच समावेश होता. आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर होता. लखनऊ फ्रँचायझी संघाने या खेळाडूसाठी १६ कोटी रुपये मोजले होते.    

आधी पाकिस्तानच्या रिझवानच्या नावे होता हा विश्व विक्रम  

पाकिस्तानचा विकेट किपर बॅटर मोहम्मद रिझवान याने २०२१ मध्ये ४८ टी२० सामन्यात ५६.६० च्या सरासरीने एक शतक आणि १८ अर्धशतकाच्या मदतीने २ हजार ३६ धावा केल्या होत्या. १०४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पाकिस्तानी खेळाडूनं सेट केलेला हा विक्रम कॅरेबियन स्टारनं मोडीत काढला आहे.

   

टॅग्स :टी-20 क्रिकेटवेस्ट इंडिजपाकिस्तानआयपीएल २०२४