Join us  

WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'

इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक वनडे सामन्यात कॅरेबियन संघाने ८ विकेट राखून मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 11:00 AM

Open in App

वेस्ट इंडिजच्या संघानं बार्बाडोस येथील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या वनडे सामन्यात  इंग्लंडच्या संघाला पराभवाचा दणका दिला. या सामन्यासह कॅरेबियन संघानं ३ सामन्यांची वनडे मालिकाही आपल्या नावे करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  वेस्ट इंडिजच्या संघाने पहिला वनडे सामना ८ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या वनडेत इंग्लंड संघाने ५ विकेट्स राखून  बाजी मारत मालिका बरोबरीत आणली होती. पण शेवटचा आणि निर्णायक वनडे सामन्यात कॅरेबियन संघाने ८ विकेट राखून मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. 

इंग्लंडकडून सॉल्टसह डॅनची फिफ्टी 

पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने ८ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित ५० षटकात २६३ धावा काढल्या होत्या. सलामी बॅटर फिलिप सॉल्ट (Philip Salt) आणि डॅन मौसली (Dan Mousley) यांनी अर्धशतके झळकावली. फिलिप सॉल्टनं ७४ तर मूसलीनं ५३ धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करताना यजमान वेस्ट इंडिज संघानं दमदार सुरुवात केली. एविन लुईसच्या रुपात सातव्या षटकात कॅरेबियन संघाला पहिला धक्का बसला.  इंग्लंडच्या दोन अर्धशतकांना शतकी रिप्लाय

ब्रँडन किंग (Brandon King) आणि केसी कार्टीनं (Keacy Carty)दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या २५० पार नेली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी रचली. जी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरली.  ब्रँडन किंग आणि केसी कार्टी दोघांनी शतके साजरी केली. वेस्टइंडिच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंड विरुद्ध दोन फलंदाजांनी शतकी खेळी करण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २००६ मध्ये ख्रिस गेल आणि डीजे ब्रावो यांनी सेंच्युरी मारली होती. 

इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात एकाच वेळी दोन शतके झळकवणारे कॅरेबियन फलंदाज 

  • ख्रिस गेल (१०१) आणि डीजे ब्रावो (११२*) - अहमदाबाद २००६ (चॅम्पियन्स ट्रॉफी)
  • ब्रँडन किंग (१०२) आणि केसी कार्टी (१२८*) - ब्रिजटाउन २०२४

 

केसी कार्टीचं शतक ठरलं विक्रमी, असा पराक्रम करणारा ठरला पहिला

ब्रँडन किंग १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०२ धावा करून माघारी फिरला. दुसऱ्या बाजूला केसी कार्टीने नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी १५ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांनी बहरलेली होती. वनडे कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीसह त्याने खास विक्रम नोंदवला. वेस्ट इंडिजच्या वनडे इतिहासात शतक झळकावणारा सिंट मार्टेनचा तो पहिला क्रिकेटर ठरला. एवढेच नाही तर त्याने क्रिकेट जगतातील दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला. वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड आता त्याच्या नावे झाला आहे.  याआधी  १९७६ मध्ये व्हिव्ह रिचर्ड्स यांनी नाबाद ११६ धावांची खेळी केली होती. हा विक्रम केसीनं १२८ धावा करत मागे टाकलाय. 

टॅग्स :वेस्ट इंडिजइंग्लंड