West Indies beat Pakistan by 1 wicket : वेस्ट इंडिज संघान आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. त्यांनी किंग्स्टन कसोटीत पाकिस्तानवर १ विकेट राखून थरारक विजय मिळवला. पाकिस्ताननं विजयासाठी ठेवलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचे आघाडीचे तीन फलंदाज १६ धावांवर परतले होते. पाकिस्तानी गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी आणि हसन अली यांनी विंडीजला धक्के देण्याचं काम सुरू ठेवलं, परंतु केमार रोचनं अखेरच्या क्षणाला खिंड लढवताना विंडीजला १ विकेटनं विजय मिळवून दिला. रोचनं नाबाद ३० धावा केल्या, तर पाच विकेट्स घेणाऱ्या जयडेन सिल्सनं १३ चेंडू खेळून काढत त्याला साथ देत विजयात हारभार लावला. विंडीजच्या या विजयानं फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर टीम इंडियालाही धक्का बसला आहे.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात विंडीजनं २५३ धावा करून नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्तान जबरदस्त कमबॅक करेल असे वाटत होते. पण, घडले भलतेच. अबिद अली ( ३०), कर्णधार बाबर आझम ( ५५) आणि मोह्म्मद रिझवान ( ३०) यांनी संघर्ष केला. जयडेननं १५.४ षटकांत ५५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. केमार रोचनं ३ विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. पाकिस्तानचा दुसरा डाव २०३ धावांवर गडगडला. विंडीजच्या २० वर्षीय गोलंदाज जयडेन सिल्स ( Jayden Seales ) याच्यासमोर पाकिस्तानच्या दिग्गजांनी हार मानली. विंडीजकडून कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम १९५० साली अल्फ व्हॅलेंटाईन ( २० वर्ष) यांनी नोंदवला होता. जयडेन १९ वर्ष व ३४० दिवसांचा आहे.
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेर्मेड ब्लॅकवूडनं ५५ धावा केल्या, परंतु अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रोचनं नाबाद ३० धावा केल्या. ९ बाद १५१ धावा असताना रोच व जयडेन ही अखेरची जोडी मैदानावर होती. पाकिस्तानला विजयाच्या आशा होत्या, परंतु या दोघांनी १७ धावांची भागीदारी करून विंडीजचा विजय पक्का केला. शाहिननं ५० धावांत ४, तर हसन अलीनं ३७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विंडीजचा हा पहिला विजय ठरला अन् त्यांनी १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया व इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला अन् त्यामुळे दोन्ही संघांना ४-४ गुण वाटून दिले. पण, षटकांची मर्यादा संथ राखल्यामुळे आयसीसीनं त्यांचे प्रत्येकी २ गुण वजा केले.
Web Title: West Indies beat Pakistan by 1 wicket; They are currently the table toppers of World Test Championship
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.