लंडन : सलामीचा फलंदाज ईविन लुईसच्या वेगवान शतकाच्या जोरावर तसेच लेग स्पिनर सॅम्युअल बद्री याच्या फायदेशीर गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने लॉर्डस्वर टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात आयसीसी विश्व इलेव्हनवर ७२ धावांनी विजय मिळवला.
वेस्ट इंडिजमध्ये गेल्या वर्षी झालेल्या वादळामुळे स्टेडिअमचे नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्निर्माणासाठी या सामन्यातून रक्कम गोळा करण्यात आली. लुईस याने २६ चेंडूत पाच षटकार आणि पाच चौकार ठोकत ५८ धावा केल्या. त्यासोबतच मार्लोन सॅम्युअल्सने ४३, दिनेश रामदीन याने नाबाद ४४ आणि आंद्रे रसेल याने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. त्या जोरावर विंडिजने चार बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात विश्व एकादशचा संघ १६.४ षटकांत १२७ धावांवर बाद झाला. त्याच्यांकडून श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसरा परेरा याने ३७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक याला खातेही उघडता आले नाही. बद्री याने तीन षटकांत चार धावा देत दोन गडी बाद केले. तर जलदगती गोलंदाज केसरिक विल्यम्स याने ४२ धावांत तीन आणि रसेल याने २५ धावांत दोन गडी बाद केले.
बद्री याने आपल्या पहिल्या दोन षटकांत दोन गडी बाद केले त्यात कार्तिकचाही समावेश आहे. रसेलनेही आपल्या सुरुवातीच्या दोन षटकांत दोन गडी बाद केले. त्यामुळे विश्व इलेव्हनची धावसंख्या ४ बाद ८ धावा अशी झाली होती. शोएब मलिक याने १२ धावा केल्या.
इर्मा आणि मारिया या वादळांमुळे एंगुईला आणि डोमिनिकामध्ये स्टेडिअमचे नुकसान झाले होते. त्यासाठी हा सामना घेण्यात आला. विश्व एकादशचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याने २० हजार डॉलरची रक्कम दान केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आफ्रिदीला लॉर्ड्सवर गार्ड आॅफ आॅनर देण्यात आला.
Web Title: West Indies beat world champions by 72 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.