गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यांनी 26 वर्षीय राहकीम कोर्नवॉलला कसोटीत खेळण्याची संधी दिली आहे, तर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला वगळले आहे. 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून 6 फुट उंच आणि 140 किलो वजनाचा 'अगडबंब' कोर्नवॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
गेलची या संघात निवड न होणे हा चर्चेचा विषय ठरत असताना कोर्नवॉलची निवड सर्वांना अचंबित करणारी आहे. एंटीग्वा येथे जन्मलेल्या कोर्नवॉरची उंची ही 6.5 फुट आहे आणि त्याचे वजन 140 किलोच्या आसपास आहे. 26 वर्षीय खेळाडूने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण, त्याला तंदुरुस्तीच्या कारणास्तव संघात स्थान दिले गेले नव्हते. पण, आता टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी संघात त्याला संधी मिळाली आहे आणि तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
फिरकी गोलंदाजीसह कोर्नवॉल फलंदाजीतही उपयुक्त खेळी करू शकतो. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 55 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 97 डावांत 24.43च्या सरासरीनं 2224 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 54 झेलही टीपले आहेत. त्याने 23.90च्या सरासरीनं 260 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीसीठी वेस्ट इंडिजचा संघ जेन होल्डर ( कर्णधार ), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, राहकीम कोर्नवॉल, शेन डॉवरीच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.
कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.
कसोटी मालिका22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून