नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचे (T20 World Cup 2022) बिगुल वाजले आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातून यंदा अनेक नामांकित खेळाडूंना वगळण्यात आले आहे. मात्र कर्णधार निकोलस पूरन याने आपला युवा खेळाडूंवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. खरं तर मागील वर्षी विश्वचषकात खेळलेल्या १२ खेळाडूंचा विंडिजच्या संघातून पत्ता कट झाला आहे.
अनुभव आणि युवा खेळाडू यांच्यात समतोल हवा - पूरन
दरम्यान, वेस्ट इंडिजच्या सध्याच्या संघाला कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आणि लेंडल सिमन्स यांसारख्या नामांकित खेळाडूंची कमी भासणार आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण यांसारखे खेळाडू देखील संघात नसणार आहेत. यावेळी विंडिजचा कर्णधार पूरन म्हणाला, "माझ्या मते अनुभव आणि युवा खेळाडू यांच्यात समतोल असायला हवा. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा आम्ही दोन विश्वचषक जिंकले तेव्हा आमच्याकडे अनेक नामांकित खेळाडू होते पण गेल्या वर्षीही आमच्या संघात अनेक नामांकित खेळाडू असूनही आम्ही क्लालिफाय देखील करू शकलो नव्हतो."
युवा खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत
स्कॉटलंडविरुद्धच्या सोमवारच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने म्हटले, "हे एका खेळाडूवर अवलंबून नाही, तर ते आमच्या संपूर्ण संघाच्या कामगिरीशी संबंधित आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद जिंकले होते आणि तेव्हा त्यांच्याकडे फारसे नामांकित खेळाडू नव्हते. पण विश्वचषक जिंकू शकतो असा संघ त्याच्याकडे आहे हे त्यांनी सिद्ध केले होते." खरं तर वेस्ट इंडिजच्या सध्याच्या संघात अनुभवी खेळाडूंची कमी आहे. अनुभव कमी आहे हे आमच्यासाठी आव्हान असेल पण आमचे खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत. मागील दोन आठवड्यांपासून ते ऑस्ट्रेलियातील परिस्थिशी जुळवून घेण्यासाठी तयार आहेत, असे वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने अधिक म्हटले.
टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड
अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-१२ फेरी
गट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: West Indies captain Nicholas Pooran said that although we do not have experienced players in our team, we have confident players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.