नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकीकडे या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत, तर दुसरीकडे सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८ संघ आमनेसामने आहेत. आज ब गटातील वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात सामना पार पडला. नवख्या आर्यलंडच्या संघाने शानदार विजय मिळवून विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. तर दोन वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ आगामी टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर चाहत्यांनी संघाची चांगलीच खिल्ली उडवली. 'वेस्ट इंडिज आता Waste Indies आहे' असे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
आयर्लंडचा ९ गडी राखून मोठा विजयवेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात आयर्लंडच्या २ वेळच्या विश्वचॅम्पियन संघाला पराभवाची धूळ चारली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विडिंजच्या संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या. ज्याचा पाठलाग आयर्लंडच्या संघाने केवळ १ गडी गमावून १७.३ षटकांत पूर्ण केला. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. किंगने ४८ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांविरूद्ध एकतर्फी झुंज दिली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर बॅरी मॅककार्थी आणि सिमी सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकातून झाला बाहेरवेस्ट इंडिजने दिलेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी शानदार खेळी केली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नी यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करून विंडिजच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. मात्र कर्णधार बालबर्नी २३ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर स्टर्लिंग याने ४८ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी करून आयर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. संघाच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकर याने ४५ धावांची नाबाद खेळी करून मोठा हातभार लावला. वेस्ट इंडिजकडून अकेल हुसैन व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. राउंड फेरीतील ४ संघानी विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. यामध्ये आशियाई चॅम्पियन श्रीलंका, नेदरलॅंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या ४ संघाचा समावेश आहे.
सुपर-१२ फेरी गट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड.
गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड, झिम्बाब्वे,
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"