विशाखापट्टणम : विक्रमवीर विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करुन भारताला धावांचा डोंगर उभारुन दिला. मात्र यानंतर शाय होप (१२३*) आणि शिमरॉन हेटमायर (९४) यांच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर विंडीजने बरोबरी साधत सामना अनिर्णत राखला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३२१ धावांची मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजनेही ५० षटकात ७ बाद ३२१ धावा करत सामना अनिर्णित राखला.भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची अडखळती सुरुवात झाली. प्रमुख फलंदाज फारशी छाप न पाडता बाद झाल्याने त्यांची १२ षटकात ३ बाद ७४ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र येथून होप आणि हेटमायर यांनी तुफानी फटकेबाजी करत १४३ धावांची निर्णायक भागीदारी करुन भारताला प्रचंड दबावाखाली आणले. हेटमायरने ६४ चेंडूत ४ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत ९४ धावांची शानदार खेळी केली. युझवेंद्र चहलने त्याला बाद करुन भारताला मोठे यश मिळवून दिले. यावेळी यजमान बाजी मारेल असे दिसत होते, मात्र दुसरीकडे टिकलेल्या होपने अखेरपर्यंत लढताना भारताच्या हातातील विजय हिसकावून घेतला. त्याने १३४ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२३ धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून चायनामन कुलदीप यादव (३/६७) यशस्वी ठरला.तत्पुर्वी, विराटने ३७ वे एकदिवसीय शतक झळकावत १३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १५७ धावांची अप्रतिम खेळी केली. अंबाती रायडूनेही ७३ धावांचे योगदान दिले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन (२९) व रोहित शर्मा (४) स्वस्तात बाद झाले. विराट - रायुडू यांनी तिसºया गड्यासाठी १३९ धावांची भागीदारी केली. रायडू फटकेबाजी करताना बाद झाला. धोनी (२०), पंत (१७) आणि जडेजा (१३) हे फार काळ तग धरू शकले नाहीत. तथापि सर्वांसोबत लहान-लहान भागीदारी करून कोहलीने संघाला ३२१ धावांपर्यंत पोहचवले. त्याआधी, कोहलीला मिडआॅफवर प्रतिस्पर्धी कर्णधार जेसन होल्डर याने जीवदान दिले होते. हा एकमेव अपवाद वगळता कोहलीची खेळी फारच सुरेख ठरली. चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी दावा सांगणाºया रायुडूने विश्वास सार्थकी लावून ८ चौकार मारले. मात्र मोठी खेळी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. त्याने ८० चेंडूत ७३ धावा केल्या. अर्धशतक केल्यानंतर त्याने कोहलीला काहीवेळ प्रेक्षकाच्या भूमिकेत नेले. नर्स याने रायुडुला बाद केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर आला. दमदार सुरुवात केलेला धोनी (२०) मॅककॉयच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.>संक्षिप्त धावफलकभारत : ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा. (विराट कोहली नाबाद १५७, अंबाती रायुडू ७३, शिखर धवन २९; अॅश्ले नर्स २/४६, ओबेड मॅककॉय २/७१.) अनिर्णित वि. वेस्ट इंडिज : ५० षटकात ७ बाद ३२१ धावा (शाय होप नाबाद १२३, शिमरॉन हेटमायर ९४, चंद्रपॉल हेमराज ३२; कुलदीप यादव ३/६७.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विंडीजने लढत अनिर्णित राखली....
विंडीजने लढत अनिर्णित राखली....
विक्रमवीर विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करुन भारताला धावांचा डोंगर उभारुन दिला.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:15 AM