ब्रायन लारा म्हणजे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटची ओळख म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. १२ एप्रिल २००४ हा दिवस क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराने विश्वविक्रम नोंदवला होता. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूला ४०० धावांचा आकडा गाठता आला होता. तेव्हापासून काही खेळाडूंनी त्रिशतक झळकावले पण कोणालाच ४०० धावांचा विक्रम मोडता आला नाही. पण, आता खुद्द लाराने हा विक्रम भारताचा स्टार खेळाडू तोडू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, भारताचा सलामीवीर शुबमन गिलमध्ये एका डावात ४०० धावा करण्याची क्षमता असल्याचे त्याने सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ब्रायन लाराने म्हटले, "शुबमन गिल माझा विश्वविक्रम तोडू शकतो. त्याला वन डे विश्वचषकात भलेही शतक झळकावता आले नसले तरी त्याच्यात खूप क्षमता आहे. त्याचे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक आहे. वन डे मध्ये द्विशतक ठोकण्याची किमया देखील त्याने साधली. गिलने आयपीएलमध्ये अनेकदा मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. आगामी काळात अनेक वर्षे तो क्रिकेटवर राज्य करेल."
गिल माझा विश्वविक्रम मोडू शकतो - लारा
तसेच जर गिल काउंटी क्रिकेट खेळला तर तो माझा ५०१ नाबाद धावांचा विश्वविक्रम नक्कीच मोडू शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा पार करू शकतो. अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. विशेषतः फलंदाजीत. फलंदाज जगभरात ट्वेंटी-२० लीग खेळत आहेत. आयपीएलने सर्व काही बदलले आहे. शुबमन गिल मोठी धावसंख्या करेल आणि त्याच्यात ही क्षमता देखील आहे, असेही लाराने नमूद केले.
शुबमन गिल सुसाट
२०२३ हे वर्ष शुबमन गिलसाठी खूप खास राहिले. यंदाच्या वर्षात शुबमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. आयपीएल २०२३ च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासह त्याने पहिल्यांदाच ऑरेंज कॅप पटकावली. दरम्यान, २०२३ या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गिलची नोंद झाली आहे. त्याने चालू वर्षात एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये ५०.४२च्या सरासरीनुसार २,११८ धावा करण्यात त्याला यश आले. वन डे मध्ये द्विशतक झळकावण्याची किमया देखील गिलने या वर्षात साधली. न्यूझीलंडविरूद्ध १४९ चेंडूत २०८ धावा करून गिल वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला.
Web Title: west indies legend Brian Lara said, indian star Shubman Gill will break my record of 400* and 501* read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.