हैदराबाद : वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या कारकिर्दीत प्रथमच सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम केला. उमेशच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजचा दुसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी तिसऱया दिवशी विक्रमी १० गडी राखून पराभव करीत मालिकेत क्लीन स्वीप दिला.
विंडीज संघ भारताला पहिल्या डावात ३६७ धावांत रोखण्यात यशस्वी ठरला; पण त्यानंतर त्यांच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात ५६ धावांची आघाडी घेणाºया भारताला विजयासाठी दुसऱया डावात ७२ धावांचे लक्ष्य मिळाले.
पृथ्वी शॉ (नाबाद ३३) आणि संघर्ष करीत असलेला के. एल. राहुल (नाबाद ३३) यांनी १६.१ षटकांत सलामीला ७५ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताला तिसºया दिवशी विजय मिळवून दिला. १८ वर्षे ३३९ दिवसांचे वय असलेल्या शॉने विजयी चौकार लगावला. भारतातर्फे विजयी धाव घेणारा तो सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे.
उमेशने ४५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने सामन्यात १३३ धावांमध्ये १० बळी घेण्याचा पराक्रम केला. तो कपिलदेव व जवागल श्रीनाथ यांच्यानंतर मायदेशात १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. उमेशला दुसºया डावात अन्य तीन गोलंदाज रवींद्र जडेजा (३-१२), रविचंद्रन आश्विन (२-२४) आणि कुलदीप यादव (१-४५) यांची योग्य साथ लाभली.
विंडीजचे फलंदाज पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसले. त्यांच्यातर्फे सुनील अंबरीशने ३८ व शाई होपने २८ धावा फटकावल्या. उमेशला विंडीजच्या दुसºया डावात सुरुवातीला दोन डावांमध्ये विभाजित झालेली हॅट्ट्रीक नोंदवण्याची संधी होती; पण के्रग ब्रेथवेट (०) पहिल्या चेंडूवर बचावला. पण दुसºया चेंडूवर लेग साईडला त्याने यष्टिरक्षक ऋषभ पंतला झेल दिला.
दुसरा सलामीवीर किरोन पॉवेल (६) याला आश्विनने माघारी परतवले. त्यानंतर शाई होप व शिमरोन हेटमेयर (१७) यांनी तिसºया विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. दरम्यान होपने उमेशच्या गोलंदाजीवर तीन शानदार चौकार लगावले. हेटमेयरच्या अडथळा कुलदीपने दूर केला, तर होपला जडेजाने तंबूचा मार्ग दाखविला. विंडीजला पहिल्या डावातील शतकवीर रोस्टन चेजकडून (६) मोठ्या खेळीची आशा होती; पण उमेशच्या इनस्विंगवर त्याचा त्रिफळा उडाला. उमेशने त्यानंतर शेन डोरिचला (०) खाते उघडण्यापूर्वीच बाद केले.
उमेशला त्यानंतर हॅट््ट्रिकची संधी होती; पण होल्डरने त्याला त्यापासून रोखले. उमेशने शेनोन गॅब्रियलला बाद करीत विंडीजचा डाव गुंडाळला आणि सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याआधी, जडेजाने होल्डर व अंबरीश यांना बाद केले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली.
भारताने सकाळच्या सत्रात ४ बाद ३०८ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पंतला सलग दुसºया सामन्यात शतकाने हुलकावणी दिली. भारताची धावसंख्या एकवेळ ४ बाद ३१४ होती, पण त्यानंतर १६.१ षटकांत २५ धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताची ९ बाद ३३९ अशी अवस्था झाली. त्यानंतर आश्विनने (३५) उपयुक्त योगदान देताना दुखापतग्रस्त शार्दूल ठाकूरच्या (नाबाद ४) साथीने अखेरच्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. विंडीजचा कर्णधार होल्डरने (२३ षटकांत ५६ धावांत ५ बळी) दुसºया नव्या चेंडूंचा चांगला वापर केला. त्याने कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा पाच बळी घेतले. गॅब्रिएलने १०७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. होल्डरने उसळी घेणाºया चेंडूवर रहाणेला (८० धावा, ७ चौकार) बाद केले. रहाणे व पंत यांनी पाचव्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली. पंतला (९२) कालच्या धावसंख्येत केवळ ८ धावांची भर घालता आली. पंत राजकोटमध्ये पहिल्या कसोटी सामन्यातही ९२ धावा काढून बाद झाला होता. त्याने १३४ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व २ षटकार लगावले.
होल्डरने जडेजा (०) व कुलदीप (२) यांना झटपट माघारी परतवत डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. आश्विनने पहिला कसोटी सामना खेळणाºया शार्दूलच्या साथीने उपयुक्त भागीदारी केली.