West Indies ODI squad vs India: रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. BCCI नं बुधवारी भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies) यांच्याविरुद्धच्या मालिकेसाठी वन डे व ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. दीपक हुडा, रवी बिश्नोई या नवीन चेहऱ्यांसह भारतीय ताफ्यात काही बदल पाहायला मिळाले. इथे भारतानं संघ जाहीर करताच २४ तासांच्या आत वेस्ट इंडिजनं त्यांची तगड्या खेळाडूंची नावं जाहीर केली. वेस्ट इंडिजनं या दौऱ्यासाठीचा वन डे संघ गुरुवारी जाहीर केला. ६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत या मालिका खेळवण्यात येणार आहेत.
वन डे मालिकेतील सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ६ , ९ व ११ फेब्रुवारीला खेळवण्यात येतील. ही मालिकात आयसीसी वन डे सुर लीगचा भाग असल्यानं वेस्ट इंडिजला २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. विंडीजनं जाहीर केलेल्या वन डे संघात जलदगती गोलंदाज केमार रोच, मधल्या फळीतील फलंदाज एनक्रुमाह बोनर आणि सलामीवीर ब्रेंडन किंग यांचे पुनरागमन झाले आहे. रोचनं ९२ वन डेत १२४ विकेट्स घेतल्या आहे. बोनरनं मागच्या वर्षी बांगलादेशविरुद्ध वन डेत पदार्पण केले होते आणि त्याला ३ सामन्यांतच संधी मिळाली आहे. किंगनं चार वन डे सामने खेळले आहेत.
निवड समिती प्रमुख डॉ. डेशमोंड हायनेस म्हणाले,केमार रोच हा सर्वोत्तम विकेट घेणाऱ्या आमच्या गोलंदाजांपैकी एक आहे आणि तो संघाला सुरुवातीलाच विकेट मिळवून देईल, असा विश्वास आहे. बोनरची कामगिरी चांगली झालेली आहे आणि त्याला आणखी संधी देण्याची गरज आहे. ''
वेस्ट इंडिजचा संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), फॅबियन एलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार्ह ब्रुक्स, जेसन होल्डर, शे होप, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारिओ शेफर्ड, ओदीन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर ( Kieron Pollard (C), Fabian Allen, Nkrumah Bonner, Darren Bravo, Shamarh Brooks, Jason Holder, Shai Hope, Akeal Hosein, Alzarri Joseph, Brandon King, Nicholas Pooran, Kemar Roach, Romario Shepherd, Odean Smith, Hayden Walsh Jr.)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेतील तीन वन डे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेंटी-२० सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.सुधारीत वेळापत्रकानुसार ६, ९, ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८ व २० फेब्रुवारीला कोलकातात ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील.