West Indies vs Sri Lanks: गॉलमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत एक मोठी घटना घडली आहे. मैदानात फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूच्या हेल्मेटवर जोरात चेंडू आदळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत इतकी गंभीर होती की खेळाडू जागीच कोसळला आणि त्याला मैदानातून थेट स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. दुखापत झालेल्या खेळाडूचं नाव जेरेमी सोलोजानो (Jeremy Solozano) असं आहे. २६ वर्षीय जेरेमी आज वेस्ट इंडिजकडून कसोटीत पदार्पण करत होता. पण आपल्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातच जेरेमी याला दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे.
मैदानात फलंदाजाचा जवळच फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेरेमीनं घातलेल्या हेल्मेटच्या ग्रिलवर चेंडू आदळला. फलंदाजाच्या अगदीच जवळच क्षेत्ररक्षणासाठी उभं असल्यानं चेंडूचा वेग प्रचंड होता. चेंडू हल्मेटवर आदळ्यानंतर जेरेमी थेट खालीच कोसळला. त्यानंतर वैद्यकीय पथक तातडीनं मैदानात दाखल झालं आणि जेरेमी याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं. तिथून अॅब्म्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयात आता जेरेमीच्या दुखापतीवर उपचार सुरू असून विविध स्कॅन केले जात आहेत. त्यानंतरच दुखापतचं गांभीर्य किती आहे हे लक्षात येणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं ट्विट करत जेरेमी सोलोजानो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.
श्रीलंकेच्या डावाच्या २४ व्या षटकात घडली घटनावेस्ट इंडिजचा खेळाडू जेरेमी सोलोजानो याच्या हेल्मेटवर चेंडू आदळण्याची घटना सामन्याच्या २४ व्या षटकात घडली. २४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संपूर्ण प्रकार घडला. रोस्टन चेजच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू थेट फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या पदार्पणवीर जेरेमीच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू आदळल्यानंतर तातडीनं त्यानं हेल्मेट काढलं आणि तो जमिनीवर कोसळला. चेंडू हेल्मेटच्या ग्रीलवर आदळला होता. प्रथम दर्शनी दुखापत खूप गंभीर असल्याचं दिसून येत होतं.