फिरकीच्या 'बादशहा'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम; ४ वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा सामना

सुनील नारायणला मिस्ट्री स्पिनर म्हणूनही ओळखले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:34 PM2023-11-05T18:34:21+5:302023-11-05T18:34:38+5:30

whatsapp join usJoin us
west indies star Sunil Narine has announced his retirement from international cricket  | फिरकीच्या 'बादशहा'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम; ४ वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा सामना

फिरकीच्या 'बादशहा'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम; ४ वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नारायणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. सुनील नारायणला मिस्ट्री स्पिनर म्हणूनही ओळखले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करून वेस्ट इंडिजला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. भल्याभल्यांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा नारायण फलंदाजीत देखील स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध होता. सुनील नारायणने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त असल्याचे जाहीर केले. "माझ्या सर्व चाहत्यांसाठी आणि ओळखीच्या लोकांना हा माझा संदेश आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे", असे त्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले.

सुनील नारायणने या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहले, "मी सर्वांना सांगू इच्छितो की, ४ वर्षांपूर्वी मी वेस्ट इंडिजसाठी माझा शेवटचा सामना खेळला होता आणि आता मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. अनेकांनी मला पाठिंबा दिला आहे आणि मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो."

सुनील नारायणने वेस्ट इंडिजसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली असून एक वेगळी ओळख निर्माण केली. ६५ वन डे सामन्यांमध्ये ९२ बळी घेतले आहेत, तर ६ कसोटी सामन्यांत २१ बळी घेण्यात त्याला यश आले. आपल्या फिरकीच्या जाळ्यात भल्याभल्यांना फसवणाऱ्या नारायणने ट्वेंटी-२० मध्ये ५१ सामन्यांत २१.२५ च्या सरासरीने ५२ बळी घेतले आहेत. आता सुनील नारायण फ्रँचायझी लीग क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे.

Web Title: west indies star Sunil Narine has announced his retirement from international cricket 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.