लंडन : कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचे ३९ सदस्यांचे पथक कोविड-१९ मुळे बदललेल्या परिस्थितीमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मंगळवारी मॅन्चेस्टरमध्ये डेरेदाखल झाले. कोरोना व्हायरस महामारीमुळे मार्चपासून जगभरातील क्रिकेट ठप्प आहे आणि वेस्ट इंडिज संघ त्यानंतर कुठल्या देशाचा दौरा करणारा पहिला संघ ठरला आहे. या मालिकेदरम्यान तीन सामने जैव सुरक्षित वातावरणात खेळल्या जाणार असून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश राहणार नाही.
विंडीजहून रवाना होण्यासाठी सर्व खेळाडूंची कोविड-१९ चाचणी करण्यात आली आणि सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. खेळाडूंना सोमवारी कॅरेबियन द्वीपसमूहातील विविध बेटांवरून दोन विमानांनी आणण्यात आले आणि त्यानंतर ते विशेष विमानाने इंग्लंडला रवाना झाले. कॅरेबियन संघ सात आठवड्यांच्या या दौऱ्यात आता ओल्ड ट्रॅफर्डवर १४ दिवस विलगीकरणात राहणार आहे. येथेच हा संघ अखेरचे दोन कसोटी सामने खेळणार आहे. सर्व खेळाडू येथे दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांची कोविड-१९ चाचणी होणार आहे. खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात राहावे लागेल आणि सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल.
पहिला कसोटी सामना ८ जुलैपासून एजेस बाऊलमध्ये खेळल्या जाईल तर दुसरा (१६ ते २० जुलै) अािण तिसरा (२४ ते २८ जुलै) कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डमध्ये होईल. तीन कसोटी सामने २१ दिवसाच्या अंतरात होतील. या स्टेडियमच्या जवळ किंवा आत हॉटेल असल्यामुळे या स्थळांची निवड करण्यात आली. त्यामुळे जैव सुरक्षित वातावरण तयार करता येईल. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) या प्रयत्नानंतरही वेस्ट इंडिजचे तीन खेळाडू डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमेयर आणि किमो पॉल यांनी त्यांच्या बोर्डाकडून निर्णय घेण्याची सूट मिळाल्यानंतर दौºयावर जाण्यास नकार दिला.वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने रवाना होण्यापूर्वी हा दौरा क्रिकेटसाठी मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे.होल्डर म्हणाला, ‘आम्ही मालिकेसाठी इंग्लंडला जात आहोत. हे खेळांसाठी व विशेषत: क्रिकेटसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.’ या दौºयामुळे क्रिकेट पुन्हा मूळपदावर येण्याची शक्यता आहे.मालिकेत खेळतानाही खेळाडूंना काही कठोर स्वास्थ्य नियमांचे पालन करावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीने चेंडूवर लकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर न करण्याची शिफारस केली आहे. याला बुधवारी होणाºया आयसीसी बोर्डाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त खेळाडू व सपोर्ट स्टाफची सातत्याने चाचणी करण्यात येणार आहे.वेस्ट इंडिजला पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार मे व जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा होता, पण कोरोना व्हायरस महामारीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता.फलंदाजी प्रशिक्षक मोंटी देसाई संघासोबत या दौºयावर गेलेले नाहीत. ते अद्याप भारतातच आहेत. भारतात कोविड-१९ मुळे प्रवास बंदी लागू आहे. वेस्ट इंडिजने त्यांच्या स्थानी फ्लॉयड रीफरची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. व्हिडिओ विश्लेषक ए.आर. श्रीकांत भारतात राहून संघाची मदत करणार आहेत.वेस्ट इंडिजच्या पथकात मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स, रीफर, सहायक प्रशिक्षक रोडी एस्टविक आणि रेयन ग्रिफिथ व वैद्यकीय अधिकाºयाचाही समावेश आहे.इंग्लंड दौºयावर मंगळवारी दाखल झालेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन होल्डर आणि स्टाफने मॅन्चेस्टर येथे असा मास्क घालून हॉटेलमध्ये प्रवेश केला.जैव सुरक्षित वातावरणात राहणार असल्यामुळे खेळाडूंना येथून बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दौºयासाठी १४ मुख्य खेळाडूंव्यतिरिक्त ११ राखीव खेळाडूंनाही संघात ठेवले आहे. राखीव खेळाडू कसोटी संघाच्या तयारीसाठी मदत करतील आणि कुणी खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याचे स्थान सहज घेऊ शकतील.वेस्ट इंडिज संघ :- जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, नक्रुमा बोनर, क्रेग ब्रेथवेट, शमर ब्रुक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेज, रकीम कॉर्नवाल, शेन डाऊरिच, केमार होल्डर, शाई होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमार रोच.राखीव खेळाडू :- सुनील अंबरीस, जोशुआ डासिल्वा, शैनन गॅब्रियल, किन हार्डिंग, काईल मेयर, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विनो मिंडले, शाइनी मोसले, अँडरसन फिलिप, ओशेन थॉमस आणि जोमेल वार्रिकान.