वेस्ट इंडिजच्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडू रहकिम कोर्नवॉलने ( Rahkeem Cornwall ) अटलांटा ओपन ( Atlanta Open 2022) स्पर्धेत खतरनाक खेळी केली. अटलांटा फायर व स्क्वेअर ड्राईव्ह यांच्यातल्या सामन्यात रहकिमने ७७ चेंडूंत नाबाद २०५ धावांचा धो धो पाऊस पाडला. रहकिमने २०१९मध्ये भारताविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले, परंतु त्याच्या १४० किलो वजनामुळे त्याची चर्चा रंगली. पहिल्याच सामन्यात त्याने चेतेश्वर पुजारा व रवींद्र जडेजा यांच्यासारख्या स्टार फलंदाजांना बाद करून नाणे खणखणीत वाजवले. पण, त्यानंतर विंडीज संघातून त्याला वगळण्यात आले. मात्र तो कॅरेबिन प्रीमिअर लीग आणि अन्य ट्वेंटी-२० लीगमध्ये फलंदाजीने दहशत माजवतोय.
त्याने ९ कसोटीत २३८ धावा केल्या आणि ३४ विकेट्स घेतल्या आहेत. ६४ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर १०१९ धावा आहेत आणि २९ विकेट्स आहेत. फर्स्ट क्लास व लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याचा दबदबा आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने २६९५ धावा व ३५४ विकेट्स, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये १३५० धावा व ६२ विकेट्स घेतल्या आहेत. बुधवारी अटलांटा ओपन स्पर्धेत त्याच्या फटकेबाजीसमोर स्क्वेअर ड्राईव्ह संघाच्या गोलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर अटलांटा फायर संघाने २० षटकां त१ बाद ३२६ धावांचा एव्हरेस्ट उभा केला. हे लक्ष्य पार करणे स्क्वेअर ड्राईव्ह संघाच्या आवाक्याबाहेरच होते आणि त्यांना १७२ धावांनी हार मानावी लागली.
अटलांटा फायर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदीजाचा निर्णय घेतला आणि रहकिमने पहिल्या विकेटसाठी स्टीव्हन टेलरसह १०१ धावांची भागीदारी केली. टेलर १८ चेंडूंत ५३ धावा करून माघारी परतला. पाकिस्तानी फलंदाज सामी अस्लम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण, रहकिमने त्याला संधीच दिली नाही. त्याने १७ चौकार व २२ षटकारांच्या मदतीने २२६.२३च्या स्ट्राईक रेटने नाबाद २०५ धावा चोपल्या. अस्लमनसह त्याने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद २०५ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात स्क्वेअर ड्राईव्हला ८ बाद १५४ धावाच करता आल्या. जस्टीन दिलने १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"