Join us  

वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर थरारक विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने टाकले भक्कम पाऊल

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या बांगलादेशने विंडीज महिलांना ५० षटकांमध्ये केवळ ९ बाद १४० धावांवर रोखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 10:06 AM

Open in App

माऊंट मोनगानुई : कमी धावसंख्येच्या झालेल्या अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने मर्यादित धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करताना बांगलादेशला आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत ४ धावांनी नमवले. यासह विंडीज महिलांनी गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवताना उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या बांगलादेशने विंडीज महिलांना ५० षटकांमध्ये केवळ ९ बाद १४० धावांवर रोखले. यामुळे बांगलादेशने अनपेक्षित बाजी मारणार अशीच शक्यता होती. मात्र, विंडीजने फिरकीच्या जोरावर जबरदस्त संयम बाळगताना बांगलादेशचा डाव ४९.३ षटकांत १३६ धावांमध्ये संपुष्टात आणला. हायली मॅथ्यूजने १५ धावांत ४ बळी घेत बांगलादेशचे कंबरडे मोडले. तिला ॲफी फ्लेचर (३/२९) आणि स्टेफनी टेलर (३/२९) यांनी दमदार साथ दिली.

पहिल्याच षटकात केवळ एका धावेवर पहिला धक्का बसल्यानंतर बांगलादेशने ठरावीक अंतराने बळी गमावले. त्यांच्याकडून कर्णधार निगर सुलताना (२५), नाहिदा अक्तेर (२५*), फरगाना हक (२३) आणि सलमा खातून (२३) यांनी अपयशी झुंज दिली. त्याआधी, सलमा खातून (२/२३) आणि नाहिदा अक्तेर (२/२३) यांनी विंडीजला धक्के दिले. शेमैनी कॅम्पबेलने १०७ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी केल्याने विंडीजला बऱ्यापैकी मजल मारता आली. प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने विंडीजची ७ बाद ७० धावा अशी अवस्था झाली होती. मात्र कॅम्पबेलने अखेरपर्यंत नाबाद राहत विंडीजसाठी निर्णायक खेळी खेळली. 

मैदानावरच कोसळली कॉनेल

वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शामिलिया कॉनेल क्षेत्ररक्षणादरम्यान मैदानावरच कोसळली. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. कॉनेलच्या अचानकपणे कोसळण्यामागचे कारण अद्याप कळालेले नाही. बांगलादेशच्या डावातील ४७व्या षटकात कॉनेल कोसळली आणि विंडीजच्या खेळाडूंनी तिच्याकडे धाव घेतली. यानंतर कॉनेल पोटावर हात ठेवत स्वत:हून रुग्णवाहिकेत चढली. या प्रसंगामुळे काही वेळ खेळही थांबविण्यात आला होता.

संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडिज : ५० षटकांत ९ बाद १४० धावा (शेमैनी कॅम्पबेल नाबाद ५३, हायली मॅथ्यूज १८, सलमा खातून २/२३, नाहिदा अक्तेर २/२३.) वि. वि. बांगलादेश : ४९.३ षटकांत सर्वबाद १३६ धावा (नाहिदा अक्तेर नाबाद २५, निगर सुलताना २५, फरगाना हक २३, सलमा खातून २३, हायली मॅथ्यूज ४/१५, ॲफी फ्लेचर ३/२९, स्टेफनी टेलर ३/२९.) 

टॅग्स :वेस्ट इंडिज
Open in App