West Indies vs Australia 1st T20I : वेस्ट इंडिज संघानं पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणका दिला. १४६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं १० षटकांत ५ बाद १०८ धावा केल्या होत्या. पण, ऑबेड मॅकॉयनं सामनाच फिरवला. ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज अवघ्या १९ धावांत माघारी परतले अन् वेस्ट इंडिजनं १८ धावांनी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात आंद्रे रसेलनं अर्धशतकी खेळी केली. ट्वेंटी-२० क्रिकेट कारकीर्दित १० वर्षांतील रसेलचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. ( Obed McCoy scripts West Indies' epic fight back to beat Australia in first T20I)
प्रथम फलंदाजीला मैदानावर आलेल्या विंडीजला जोश हेझलवूडनं दणादण दणके दिले. एव्हीन लुईस ( ०) व ख्रिस गेल ( ४) हे मोठे मासे त्यानं जाळ्यात अडकवले. लेंडल समिन्स ( २७), शिमरोन हेटमायर ( २०) व कर्णधार निकोलस पूरन ( १७) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र, आंद्रे रसेलनं २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून ५१ धावांची खेळी करून संघाला ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारून दिली. हेझलवूडनं ४ षटकांत १ निर्धाव षटक फेकले अन् १२ धावांत ३ विकेट्स घेतले. मिचेल मार्शनं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार आरोन फिंच ( ४) लगेच माघारी परतला. पण, मॅथ्यू वेड ( ३३) व मिचेल मार्श ( ५१) यांनी ऑसींचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियानं १० षटकांत शंभरी पार केली होती आणि त्यांच्याहातात ६ विकेट्स होत्या. पण, ११व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन मॅकडेर्मोट माघारी परतला अन् अवघ्या १९ धावांत कांगारूंचे सहा फलंदाज तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १६ षटकांत १२७ धावांत माघारी परतला. ओबेड मॅकॉय यानं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. हेडन वॉल्शनने ३ व फॅबिएन अॅलनने २ विकेट्स घेतल्या.