दक्षिण आफ्रिकेचा संघ हा क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. पण मोठ्या स्पर्धेतील सातत्यानं पदरी पडलेल्या अपयशानं त्यांना चोकर्सचा टॅग लागला आहे. आता छोट्या स्पर्धेतही त्यांनी जोकर्सवाली खेळी करून हातचा सामना गमावल्याचा सीन पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे.
सामन्यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं गमावली मालिका
कसोटी मालिका खिशात घातल्यानंतर टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अक्षरश: तोंडावर पडला. अखेरच्या ६ षटकात ६ विकेट हातात असूनही त्यांना ५० धावा करता आल्या नाही. या पराभवामुळे त्यांना तीन सामन्यांची टी-२० मालिका गवावी लागली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकात ५० धावा म्हणजे काही फार मोठं टार्गेट नाही. त्यातही ६ विकेट्स हातात असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज सामना जिंकून मालिका बरोबरीत आणेल, असे वाटत होते. पण जे घडलं ते वेस्ट इंडिज संघाचा रुबाब दाखवणारं होते.
दक्षिण आफ्रिकेचा संघ १४९ धावांवर ऑलआउट
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना त्रिनिदाद, टोबॅगो येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना यजमान वेस्ट इंडिज संघानं निर्धारित २० षटकात १७९ धावा करत पाहुण्या संघासमोर १८० धावांचे टार्गेट सेट केले होते. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १४९ धावांत ऑल आउट झाला.
६ विकेट्सच्या मोबदल्या आल्या फक्त २० धावा
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १३ व्या षटकातील ५ चेंडूवर चौथी विकेट गमावली त्यावेळी त्यांची धावसंख्या १२९ होती. पण त्यानंतर विकेट मागून विकेट पडत राहिली. २० धावांत संघाने उर्वरित ६ विकेट गमावल्या. परिणामी त्यांना ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.