West Indies vs South Africa : वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गयानाच्या मैदानात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. 15 ऑगस्टपासून दोन्ही देशांत सुरु झालेल्या या कसोटी सामन्यात पहिला दिवस लखनऊच्या युवा स्टारनं गाजवला.
कॅरेबियन ताफ्यातील जलदगती गोलंदाज शमर जोसेफ याने आपल्या वेगाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. जोसेफ याने लखनऊ सुपर जाएंट्स संघातून आयपीएलमध्ये एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले होते.
२४ वर्षीय युवा स्टार गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४ षटकं टाकळी. यात त्याने २.३५ च्या इकोनॉमीसह केवळ ३३ धावा खर्च करून अर्धा संघ तंबूत धाडण्याचा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याच्यासमोर अक्षरश: गुडघे टेकले. जोसेफ याने पाच विकेट्स घेताना दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमासह एडेन मार्करम, डेविड बेडिंघम, काइल वेरिन आणि केशव महाराजला तंबूचा रस्ता दाखवला.
सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मार्करमला त्याने अप्रतिम स्विंगवर चकवा दिला. चेंडू सोडण्याचा विचार करून फसल्यावर मार्करम फक्त बघतच राहिला. बोल्ड कसा उडला असा प्रश्नच त्याला पडला होता. जोसेफनं मार्करमची जी विकेट घेतली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. शमर जोसेफनं मार्करमला १४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. कॅप्टन टेम्बा बवुमाला तर त्याने खातेही उघडू दिले नाही.
जोसेफच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात १६० धावांत ऑलआउट झाला. गोलंदाजाच्या दमदार कामगिरीनंतर कॅरेबियन फलंदाजीची अवस्थाही बिकट झाल्याचा सीन पाहायला मिळाला. वेस्ट इंडीज संघाने पहिल्या डावात शंभरीच्या आत 7 विकेट्स गमावल्या. गयानाच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी १७ विकेट्स पडल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून विल्लम मल्डर याच्या खात्यात ४ तर बर्गरनं २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.दोन्ही संघातील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याचा निकाल दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या दिवशी १७ विकेट्स पाहायला मिळाल्यामुळे गोलंदाजांसमोर फलंदाजांचा चांगलाच कस लागणार हे स्पष्ट आहे. एवढेच नाही तर सामना निकाली लागण्याचेही संकेत मिळाले आहेत. फायनल बाजी कोण मारणार ते पाहण्याजोगे असेल. जो ही मॅच जिंकेल तो संघ मालिकाही खिशात घालेल.