Join us  

WI vs SA Live : 'करा किंवा मरा'! आफ्रिकेनं करून दाखवलं; यजमान वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर

West Indies vs South Africa Live : वेस्ट इंडिजचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:32 AM

Open in App

West Indies vs South Africa T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये आज यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ भिडले. एंटीगुआ येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनेकदा पावसाने बॅटिंग केली. दोन्हीही संघांसाठी ही लढत 'करा किंवा मरा' अशी होती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १३५ धावा करून यजमान विडिंजने सन्मानजनक धावसंख्या उभारली. कमी धावसंख्या, पावसाची बॅटिंग अन् नाना कारणांनी चर्चेत राहिलेल्या या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. यजमानांचा ३ गडी आणि ५ चेंडू राखून पराभव करण्यात त्यांना यश आले. आफ्रिकेला ६ चेंडूत ५ धावांची गरज असताना मार्को जान्सेनने षटकार ठोकून सामना संपवला. 

दरम्यान, या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकातून बाहेर झाला आहे. सुपर-८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमांनुसार यजमानांचा ३ गडी राखून पराभव केला. विडिंजने प्रथम फलंदाजी करताना १३५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या डावात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. मग १७ षटकांत त्यांना १२३ धावांचे लक्ष्य देण्यात आले. सांघिक खेळी करत आफ्रिकेने कासवाच्या गतीने धावसंख्या गाठली. त्यांनी १६.१ षटकांत ७ गडी गमावून विजय साकारला. मार्को यान्सेनने १४ चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने २९ धावांची आणि हेनरिक क्लासेनने २२ धावांची खेळी खेळली.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक खेळी केली, त्याने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४२ चेंडूत ५२ धावा कुटल्या. आफ्रिकेकडून तबरेज शम्सीने सर्वाधिक (३) बळी घेऊन यजमानांना १५० च्या आत रोखले. त्याच्याशिवाय मार्को जान्सेन, कर्णधार एडन मार्करम, केशव महाराज आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

वेस्ट इंडिजने दिलेल्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेला १२ धावांवर पहिला झटका बसला. आंद्रे रसेलने रिजा हेन्ड्रिक्सला बाहेरचा रस्ता दाखवला. याच षटकात रसेलने क्विंटन डीकॉकला देखील बाद केले. आफ्रिकेने आपल्या डावाच्या पहिल्या दोन षटकांत १५ धावा केल्या होत्या. मग पावसाच्या कारणास्तव खेळ थांबवावा लागला. तेव्हा सामना रद्द झाला असता तर इथेच दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली असती. पण, पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. मात्र डावातील तीन षटके कमी करण्यात आली. आता दक्षिण आफ्रिकेसमोर १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य होते. यामध्ये संघाने आधीच १५ धावा केल्या होत्या. म्हणजेच त्यांना १५ षटकांत विजयासाठी १०८ धावांची गरज होती. त्यामुळे केवळ दोन गोलंदाज वेस्ट इंडिजसाठी चार षटके टाकू शकत होते आणि पॉवरप्ले पाच षटकांचा करण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेला संघाच्या ४२ धावांवर तिसरा धक्का बसला. सहाव्या षटकात अल्झारी जोसेफने कर्णधार एडन मार्करामला झेलबाद केले. सहा षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ५० धावा अशी होती. दक्षिण आफ्रिकेला ६६ चेंडूत ७३ धावांची गरज असताना सामन्यात रंगत आली. मग ७७ धावांवर आफ्रिकेला हेनरिक क्लासेनच्या रूपात आणखी एक झटका बसला. आठ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ७७ धावा अशी होती. त्यानंतर डेव्हिड मिलरचा त्रिफळा आणि केशव महाराजचा बळी यामुळे यजमानांनी पुनरागमन केले. 

अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. कगिसो रबाडा आणि मार्को जॉन्सन या गोलंदाजांवर फलंदाजीतून पराक्रम करण्याची वेळ होती. त्यांनी संयमी खेळी करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली.

वेस्ट इंडिजचा संघ -रोवमन पॉवेल (कर्णधार), कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन, रोस्टन चेस, शेरफेन रूदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेड मकॉय.

दक्षिण आफ्रिकेचा संघ -एडन मार्करम (कर्णधार), रीजा हेन्ड्रिक्स, क्वींटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, तबरेज शम्सी. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024वेस्ट इंडिजद. आफ्रिका