वेस्ट इंडिजचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डनं टी-२० विश्वात एका षटकात ६ षटकार ठोकून भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पोलार्डनं श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात ही किमया साधली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार ठोकणारा तो तिसरा तर टी-२० विश्वातला दुसरा फलंदाज ठरला आहे. (west indies vs sri lanka 1st t 20 kieron pollard hit 6 six in one over)
पोलार्डनं श्रीलंकेच्या अकिला धनंजयच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ खणखणीत षटकार ठोकले आहेत. या पराक्रमासह पोलार्डनं युवराज सिंग आणि हर्षल गिब्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. युवराज सिंगनं २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात ६ षटकार ठोकले होते. तर हर्षल गिब्सनं नेदरलँडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एकाच षटकात सहा उत्तुंग षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यात बुधवारी पहिला टी-२० सामना खेळविला गेला. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना कायरन पोलार्डनं सामन्याच्या सहाव्या षटकात अकिला धनंजयच्या गोलंदाजीविरुद्ध रौद्ररुप धारण केलं आणि एकामागोमाग एक षटकांचा सिलसिला सुरू केला. पोलार्डनं अकिला धनंजयच्या एकाच षटकात ६ उत्तुंग षटकार खेचले. पोलार्डच्या साथीला असलेला जेसन होल्डर देखील त्याची फलंदाजी पाहून आवाक झालेला पाहायला मिळाला. षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही पोलार्डनं षटकार ठोकल्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला. एकाच षटकात सहा षटकार ठोकणाऱ्यांच्या युवराज आणि गिब्स यांच्यासोबत आता कायरन पोलार्डचंही नाव घेतलं जाणार आहे.
वेस्ट इंडिजनं हा सामना ४ गडी राखून जिंकला. श्रीलंकेनं वेस्ट इंडिजसमोर २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या होत्या. पोलार्डनं यात ११ चेंडूत ६ षटकारांच्या साथीनं ३८ धावा केल्या आणि संघाला सामना जिंकून दिला.
Web Title: west indies vs sri lanka 1st t 20 kieron pollard hit 6 six in one over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.