Kieron Pollard bids adieu to international cricket - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात मुंबई इंडियन्सला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला सहा सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. त्यांचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड याची कामगिरीही निराशाजनक झालेली दिसतेय. अशात वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डच्या या अचानक निवृत्तीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पोलार्डने १२३ वन डे, १०१ ट्वेंटी-२० सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने वन डेत २७०६ आणि ट्वेंटी-२०त १५६९ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर एकूण ९७ विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणारा पोलार्ड फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. १० एप्रिल २००७मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तत्पूर्वी २००८मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री मारली होती. २०२२मध्ये भारताविरुद्ध तो अखेरचा वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळला होता.
पोलार्ड म्हणाला,''खूप विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. इतर युवा खेळाडूंप्रमाणे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मी पाहिले होते आणि तेव्हा मी १० वर्षांचा होतो. वेस्ट इंडिज क्रिकेटची १५ वर्षांहून अधिककाळ सेवा करू शकलो याचा मला अभिमान आहे. माझ्या या निर्णयाने युवा खेळाडूंसाठी एक जागा रिक्त झाली आहे. मी नेहमीच विंडीज संघाला मदत करणार, मग एक खेळाडू म्हणून असो किंवा अन्य कोणत्याही जबाबदारीतून.''
Web Title: West Indies white ball skipper Kieron Pollard has announced his retirement from international cricket.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.