मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या रोमारियो शेफर्डने २८ चेंडूंत ४१ धावांची वादळी खेळी करून वेस्ट इंडिजला तिसऱ्या व शेवटच्या वन डे सामन्यात इंग्लंडविरुद्ध ४ विकेट्सने जिंकून दिला. DLS नियमांनुसार वेस्ट इंडिजने १४ चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला. शेफर्डने गोलंदाजीत ८ षटकांत ५० धावांत २ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर ४१ धावांची वादळी खेळी केली. वेस्ट इंडिजने ३१.४ षटकांत १८८ धावांचे लक्ष्य पार केले. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने मालिका २-१ अशी खिशात घातली.
वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू फोर्डने इंग्लंडला हादरवून टाकले, त्याने ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट गमावून २०६ धावा करता आल्या. पावसामुळे वेस्ट इंडिजसमोर ३४ षटकांत विजयासाठी १८८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. या विजयासह वेस्ट इंडिजने नवा इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिज संघाने २५ वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध त्यांच्या भूमीवर वन डे मालिका जिंकली.
इंग्लंडकडून बेन डकेट आणि लिएम लिव्हिंगस्टोन वगळता इतर कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. डकेटने ७३ चेंडूत ६ चौकार व १ षटकारासह ७१ धावा केल्या. लिएमने ५६ चेंडूत ४५ धावा केल्या. अल्झारी जोसेफनेही ३ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. ब्रॅंडन किंग केवळ १ धावा काढून बाद झाला. मात्र अलिक अथनाजे आणि केसी कार्टी यांनी अनुक्रमे ४५ आणि ५० धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. रोमारियाने ४१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.