भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पण, भारताचा सामना करण्यापूर्वी वेस्ट इंडिड संघाला मोठा बूस्ट मिळाला आहे. लखनौ येथे खेळवण्यात आलेल्या एकमेव कसोटी सामन्यांत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं अवघ्या 6.2 षटकांत अफगाणिस्तानचे लक्ष्य पार करत कसोटी जिंकली.
अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या डावात रहकिम कोर्नवॉलनं 75 धावांत 7 विकेट्स घेतल्या आणि अफगाणिस्तानचा पहिला डाव 187 धावांत गुंडाळण्यात विंडीजला यश आलं. अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाच्या उत्तरात वेस्ट इंडिजला 277 धावाच करता आल्या. शामार्ह ब्रुक्सनं 111 धावांची खेळी केली. त्याला जॉन कॅम्प्बेल ( 55) आणि शेन डॉवरीच ( 42) यांची उत्तम साथ लाभली. अफगाणिस्तानच्या आमीर हम्झानं 74 धावांत 5 विकेट्स घेतल्या, तर रशीद खाननं 114 धावांत 3 विकेट्स घेतल्या. झहीर खाननं दोन बळी बाद केले.
दुसऱ्या डावातही अफगाणिस्ताची घसरण सुरूच राहिली. त्यांचे 7 फलंदाज 109 धावांत माघारी परतले. या डावात कोर्नवॉल ( 3/41) आणि रोस्टन चेस ( 3/10) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. या तीन विकेटनं कोर्नवॉलच्या नावावर विक्रमाची नोंद झाली. उपखंडात एकाच कसोटीत दहा विकेट्स घेणारा तो वेस्ट इंडिजचा पहिलाच फिरकीपटू ठरला. आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा अफगाणिस्ताननं 7 बाद 109 धावा केल्या होत्या. पण, जेसन होल्डरनं झटपट उरलेल्या तीन विकेट्स घेत अफगाणिस्तानचा दुसरा डाव 120 धावांत गुंडाळला. विजयासाठी ठेवलेलं 31 धावांचं लक्ष्य विंडीजनं 6.2 षटकांत 1 विकेटच्या मोबदल्यात पार केले.
संक्षिप्त धावफलक - वेस्ट इंडिज 277 धावा ( ब्रुक्स 111, कॅम्प्बेल 55; हम्झा 5/74) आणि 1 बाद 33 धावा ( कॅम्प्बेल 19*; हम्झा 1/5) वि. वि. अफगाणिस्तान 187 ( अहमदी 39; कोर्नवॉल 7/75) आणि 120 ( अहमदी 62; चेस 3/10, होल्डर 3/20, कोर्नवॉल 3/46)
Web Title: West Indies won by 9 wickets against Afghanistan, major boost befor India series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.