ढाका : पदार्पणातील सामन्यात बांगलादेशविरोधात दुसऱ्या डावात दुहेरी शतक झळकावणाऱ्या कायल मायर्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजने दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाचव्या दिवशी जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडीजने ३९५ एवढ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलागही केला आणि तीन गडी राखून बांगलादेशला नमवले.मायर्स याने ३१० चेंडूंत २० चौकार आणि सात षटकार लगावत २१० धावा केल्या. त्यासोबतच एक अन्य फलंदाज बोन्नर (८६) याच्यासोबत चौथ्या गड्यासाठी २१६ धावांची भागीदारीही केली. वेस्ट इंडीजसाठी चौथ्या डावात कोणत्याही गड्यासाठी केलेली ही सर्वांत मोठी भागीदारी आहे.मायर्सने पहिल्या डावात ४० धावा केल्या होत्या. पदार्पणातील कसोटीत त्याने दोन्ही डावांत मिळून २५० धावा केल्या. एका बाजूने मायर्स वेगाने धावा करीत होता; तर दुसरी बाजू बोन्नरने सांभाळली होती. त्याने २५४ चेंडूंत १० चौकार आणि एक षटकार लगावला. वेस्ट इंडीजने दिवसाची सुरुवात तीन बाद ११० धावांनी केली होती. पाचव्या दिवशी विजयासाठी त्यांना २८५ धावा करायच्या होत्या. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या तासात मेहदी हसन मिराज आणि ताईलुल इस्लाम यांच्यासमोर सांभाळून खेळ केला. त्यांनी नंतर सहजतेने धावा करण्यास सुरुवात केली. दोघांनी पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या दोन सत्रांत बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. चहापानानंतर अखेरच्या सत्रात ताईलूलने बोन्नलला बाद केले. त्यानंतर हसनने जर्मेन ब्लॅकवुडला ९ धावांवरच तंबूत परत पाठविले. त्यावेळी वेस्ट इंडीजची धावसंख्या पाच बाद २९२ धावा होती. त्यानंतरही मायर्सने फटकेबाजी सुरूच ठेवली. यष्टिरक्षक जोशुआ डी सिल्वासोबत सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करीत त्याने संघाला विजयापर्यंत नेले.या भागीदारीत सिल्वाचे योगदान केवळ २० धावांचे होते. बांगलादेशने शनिवारी दुसरा डाव ८ बाद २२३ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर मेहदीने तीन बळी घेत वेस्ट इंडीजला अडचणीत आणले होते. एक वेळ संघ ३ बाद ५९ धावांवर संघर्ष करीत होता.विजयासह विक्रमलक्ष्याचा पाठलाग करताना नोंदविलेला पाचवा सर्वांत मोठा विजय आणि आशियातील सर्वांत मोठा विजय.पदार्पणाच्या कसोटीत मायर्सद्वारे नोंदवलेला २५० धावांचा स्कोअर (दोन्ही डावांतील एकूण धावा) वेस्ट इंडीजच्या कुठल्याही फलंदाजातर्फे दुसरी सर्वोच्च खेळी.मायर्स हा आपल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात शतक झळकाविणारा केवळ आठवा फलंदाज.मायर्सने ज्यावेळी ११७ धावा केल्या, त्यावेळी तो चौथ्या डावात पदार्पण करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांतर्फे सर्वोच्च धावा करणारा फलंदाज.संक्षिप्त धावफलकबांगलादेश पहिला डाव - ४३०. दुसरा डाव - बांगलादेश - ८ बाद २२३ धावा (घोषित). विंडीज पहिला डाव - २५९, दुसरा डाव - ७ बाद ३९५ ( ब्रेथवेट २०, कॅम्पबेल २३, बोन्नर ८६, मायर्स२१०, जोशुआ २०, ताईजुल २/९१, मेहदी हसन ४/११३, नईम हसन १/१०५.पदार्पणात द्विशतकटीम फॉस्टर (इंग्लंड) २८७ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १९०३लॉरेन्स रोवे (वेस्ट इंडीज) २१४ विरुद्ध न्यूझीलंड - १९७२ब्रँडन कुरुप्पू (श्रीलंका) नाबाद २०१ विरुद्ध न्यूझीलंड - १९८७मॅथ्यू सिंक्लेयर (न्यूझीलंड) २१४ विरुद्ध वेस्ट इंडीज १९९९रुडोल्फ (द. आफ्रिका) नाबाद २२२ विरुद्ध बांगलादेश २००३कायले मायर्स (वेस्ट इंडीज) नाबाद २१० विरुद्ध बांगलादेश.लक्ष्याचा पाठलाग करताना पाचवा सर्वांत मोठा विजय आणि आशियातील सर्वांत मोठा विजयवेस्ट इंडिज (७ बाद ४१८) विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००३दक्षिण आफ्रिका (४ बाद ४१४ ) विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००८ऑस्ट्रेलिया (३ बाद ४०४ ) विरुद्ध इंग्लंड १९४८भारत (४ बाद ४०६) विरुद्ध वेस्ट इंडिज १९७६वेस्ट इंडिज ( ७ बाद ३९५) विरुद्ध बांगलादेश २०२१
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वेस्ट इंडिजने मिळवला ऐतिहासिक विजय; ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग
वेस्ट इंडिजने मिळवला ऐतिहासिक विजय; ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग
पदार्पणातील सामन्यातच मायर्सचे द्विशतक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 4:01 AM