सेंट किट्स - आंद्रे रसलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट राखून विजय मिळवला. या लढतीत पावसामुळे वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 11 षटकांत 91 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. बांगलादेशने 20 षटकांत 9 बाद 143 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने 9.1 षटकांत सुधारित लक्ष्य पार केले.
विजयाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज अवघ्या 10 धावांवर माघारी परतले होते. मात्र, रसल आणि मार्लोन सॅम्युएल यांनी तिस-या विकेटसाठी 42 धावांची भागिदारी करताना डाव सावरला. सॅम्युएल बाद झाल्यानंतर रसेलने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेत रोव्हमन पॉवेलसह चौथ्या विकेटसाठी नाबाद 41 धावा जोडताना वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.
गोलंदाजीतही रसेलने 4 षटकांत 27 धावा देताना एक विकेट घेतली. त्याने फलंदाजीत 21 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकार खेचून नाबाद 35 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त सॅम्युएलने 13 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचत 26 धावा केल्या, तर पॉवेलने नाबाद 15 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरूवातही निराशाजनक झाली. तमीम इक्बाल आणि सौम्य सरकार भोपळा न फोडताच माघारी फिरले. मात्र, लिटन दास (24) आणि महमदुल्लाह (35) यांनी समाधानकारक खेळ करताना संघाला 143 धावांचा पल्ला गाठून दिला.